Pankaja Munde | ‘मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने नोटीस पाठवलीय. पंकजा यांच्या साखर कारखान्याने 19 कोटींचं जीएसटी कर थकवल्याचा दावा करण्यात आलाय.
बीड | 25 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने नोटीस पाठवलीय. पंकजा यांच्या साखर कारखान्याने 19 कोटींचं जीएसटी कर थकवल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या यूनियन बँकेच्या ताब्यात आहे. यूनियन बँकेने दिलेल्या 12 कोटींच्या कर्जाचे परतफेड न केल्याने या कारख्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलीय. त्यानंतर आता जीएसटी विभागाची नोटीस आलीय. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारने आपल्या मदत केली नाही म्हणत नाराजी व्यक्त केलीय.
‘मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी’
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “भाजपचे दिवंगत वेते गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल? हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘मी जाहीर निषेध करते’
“पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षाचं काम केलंय तेवढं करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील. सत्तेत नसताना पक्षासाठी खूप कष्ट केले. त्यांची मुलगी आज लढतेय. त्यांची मुलगी भारतीय जनता पक्षात आहे. त्या मुलीवर अन्याय करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करतोय. याचा मी जाहीर निषेध करते”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“भाजपाच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेममध्ये आलं होतं. मात्र भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला? असा सवाल उपस्थित सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव असा नारा ही लोकं देतात. मग पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.