Beed : 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. 26 जानवारीपासून त्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कमबॅक करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
बीड : केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या महाराष्टाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याचवेळी राज्यात नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच भाजपचे सर्व बडे नेते मैदानात उतरले आहेत आणि सभांचा सपाटा लावला आहे. देवेंद्र फडणवीसांची गोंदियात सभा तर पंकजा मुंडेंची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बीडमधील आष्टीत पंकज मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. 26 जानवारीपासून त्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कमबॅक करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. तसेच पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याच्या निर्णयावर पुन्हा भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
ही महाराष्ट्रातील काळी निवडणूक
आत्ताच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत त्यामुळे, ही महाराष्ट्रातील काळी निवडणूक आहे, अशा शब्दात ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यावर पंकजा मुंडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा द्यावा, असेही त्या म्हणाल्या आहेत. तसेच धनंजय मुंडेंवर टीका करताना, बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. मी पालमंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, मात्र दोन वर्षात काहीही निधी नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्यात आघाडीचे सरकार असले तरी राज्यात केंद्र निधी द्यायला कमी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही या निवडणुकीत पूर्ण जोमाने उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.