Bhandara : दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याने रडकुंडीला आणलं, नाट्यमय आंदोलन सात तासानंतर संपले
Bhandara : शेतकऱ्याचा पाण्याच्या टाकीवर सात तास ठिय्या, अधिकाऱ्यांना रडकुंडीला आणलं, शेवटी स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यानंतर...
लाखांदूर : भूसंपादन न करता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (pradhan mantri gram sadak yojana)शेतकऱ्याच्या (Farmer) शेतीतून पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्या शेतीचा आर्थिक मोबदला मिळाला नसल्याने त्याच्या मागणीसाठी भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या बारव्हा येथे प्रकाश नाकतोडे या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या नाट्यमय आंदोलन सात तासानंतर संपुष्टात आले.
लाखांदूर तालुक्यातील प्रकाश नागतोडे यांच्या सासूच्या नावाने शेत जमीन आहे. या शेतजमिनीमधून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पक्का रस्ता तयार करण्यात आला. तत्पूर्वी शेतकऱ्याची जमीन भूसंपादन करणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाने कुठलीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. शेतकऱ्याला आर्थिक मोबदलाही दिला नाही, भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी प्रशासनाकडे वारंवार खेटा घालत होता.
मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी प्रकाश नाकतोडे यांनी शेतीच्या नुकसानीचा आणि भूसंपादनाचा आर्थिक मोबदला मिळावा. यासाठी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी मागण्या मान्य करीत नसल्याचे दिसून येताच आंदोलक नाकतोडे यांनी दुपारी स्वतःवर केरोसीन टाकून जाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आंदोलनाचा धसका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेत आंदोलक शेतकरी यांच्या मागण्या मान्य केल्यात आणि एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रकाश नाकतोडे यांना मोबदला देण्याचे लिहून दिल्यावर तब्बल सात तासानंतर आंदोलन मागे घेतल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.