Nitin Gadkari | लाखनी, साकोलीतील उड्डाणपुलाचे लोकार्पण, स्टेट ऑफ आर्ट्सचा दर्जा, गोसेखुर्दच्या बेटांवर होणार फाईव्ह स्टार हॉटेल
साकोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर 2.94 किमी लांबीचा उड्डाणपूल 270 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे, तर लाखनी येथे 3.50 किमी लांबीचा 312 कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यात आला.
भंडारा : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज भंडारा जिल्ह्यातल्या साकोली (Sakoli), लाखनी (Lakhni) या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. गडकरींनी आज भंडाराकरांसाठी योजनांचा पिटारा खोलला. ते म्हणाले, गोसेखुर्द धरणाच्या बेटावर फाईव्ह स्टार हॉटेल तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तणसापासून चार लाख लिटर इथेनॉल तयार करणारे उद्योग सुरू करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. यावेळी गडकरी यांनी लाखनी आणि साकोली येथील उड्डाणपुल हे बांधकामाच्या उत्कृष्ट नमुना आहेत. देशात साकोली आणि लाखनी या उड्डाणपुलाला स्टेट ऑफ आर्ट ( State of Art) म्हणून ओळखले जाणार असल्याचं सांगितलं. तसेच या दोन पुलांना उत्कृष्ट कारागिरीचा नमुना म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा केली.
साकोलीच्या उड्डाणपुलाला श्यामराव कापगते यांचे नाव
साकोलीचा उड्डाणपूल साकोलीकरांना समर्पित केला. भाजपचे ज्येष्ठ नेते शामराव कापगते यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात आले. श्यामराव कापगते हे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांचे वडील होतं. राईस निर्यात करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार असल्याचं गडकरी म्हणाले. तसेच सीएनजीवर ट्रॅक्टर चालवणार असल्याचेही ते बोलले. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तणस होते. या तणसावर प्रक्रिया करून इथेनॉल तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळं नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले.
दोन उड्डाणपुलांवर 582 कोटी खर्च
साकोली व लाखनी उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम पार पडला. साकोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर 2.94 किमी लांबीचा उड्डाणपूल 270 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे, तर लाखनी येथे 3.50 किमी लांबीचा 312 कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यात आला. काही दिवसांपासून या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, गजानन डोंगरवार, माजी आमदार बाळा काशिवार, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते.