एक माकड राजाबाबू, एक माकड…! परिसरात माकडाची दहशत, माकड बाहेर नागरिक आत-घरात!
माकडाचा विषय लई हार्ड! माकड रोज इकडे तिकडे फिरायचं. पिसाटलेल्या माकडाची परिसरात जाम भीती. हळूहळू लोकांनी घराबाहेर येणं बंद केलं. कळप तर पळवून लावला पण त्यातलं एक माकड इथे रराहिलं त्याचं करायचं काय? माकड मागे लागायचं, सळो की पळो करून सोडायचं. इतका हैदोस घातला की त्याने 15 जणांचा चावा घेतला, विषय गंभीर! सगळेच्या सगळे दवाखान्यात. त्यातला एक तर इतका गंभीर की त्याला नागपूरला पाठवलं. मग पुढे...? वाचा
शाहिद पठाण प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी भंडारा | 1 नोव्हेंबर 2023 : एक माकड राजबाबू, एक माकड! एक माकड काय करू शकतं? एक माकड बरंच काही करू शकतं. ते जर पिसाळलेलं असेल तर ते लोकांना इतकं हैराण करू शकतं की लोक घराबाहेर पडणार नाहीत. एक माकड लोकांना सळो की पळो करून सोडू शकतं. एक माकड हैदोस घालू शकतो, अख्ख्या कॉलनीत नुसता धुमाकूळ घालू शकतो…त्याचा अवतार बघून लोकं त्याच्या भीतीने घरातच बसून राहू शकतात असं काहीतरी करू शकतो, एक माकड! ज्यांनी हे सगळं अनुभवलंय त्यांचा यावर पटकन विश्वास बसेल. ज्यांना कधीच माकडांचा त्रास झालेला नाही अशांना यावर अजिबात विश्वास बसणार नाही. आपण शक्यतो “कुत्रे मागे लागले, कुत्रा चावला, परिसरात कुत्र्यांची दहशत आहे, कुत्र्यांची भीती आहे, इथे खूप कुत्रे आहेत त्यामुळे जरा जपून जा” अशाच गोष्टी ऐकत आलोय पण हे जरा वेगळं आहे. इथे दहशत आहे ती माकडांची! इथे लोकांचा चावा घेतलाय तो माकडाने! भंडारा जिल्ह्यातील तुमसर मधली ही घटना आहे. वाचून तुम्हाला धक्का बसेल.
15 लोकांचा चावा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात दुर्गा नगर परिसरात काही दिवसांपूर्वी एक माकडांचा कळप दाखल झाला. या कळपाने परिसरातील लोकांना खूप त्रास दिला. शेवटी लोकांनी हा माकडांचा कळप कसाबसा पळवून लावला पण त्यातलं एक माकड मागे राहिलं. कळपापासून वेगळं झाल्यामुळे की काय माकड पिसाटलं! माकडाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. हळू-हळू या एका माकडाची दुर्गा नगर परिसरात एवढी धास्ती की लोक आपल्या घराबाहेर जायला घाबरायला लागले. या माकडाने लोकांना खूप हैराण केलं. पिसाटलेल्या माकडाने चक्क 15 लोकांचा चावा घेतला, यातल्या 14 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातला एकजण चावा घेतल्याने इतका गंभीर झाला की त्याला नागपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.
नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
माकडाच्या कळपाला तर नागरिकांनी पळवून लावलं होतं पण उरलेल्या, मागे राहिलेल्या एका माकडाने दुर्गा नगरमध्ये असा काय हैदोस घातला की विचारायला नको. शेवटी या एका माकडासाठी लोकांनी वनविभागाला संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभाग दाखल. वनविभागाची टीम तब्बल दोन दिवस माकडाला जेरबंद करण्यासाठी शहरात फिरत होती. अखेर दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.