Bhandara Murder case : भंडाऱ्यात सावकाराचा खून, दागिन्यांची चोरी, 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
हिरालाल हेडाऊ हे परवानाप्राप्त सावकारी व्यवसाय करीत होते. 4 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळीच्या रात्री 10.30 वाजता ते एकटे घरी होते. त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्या घरातून सोने-चांदीने दागिने लंपास केले गेले होते.
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथील सावकाराचा हत्याकांड चांगलाच गाजला होता. या प्रकरणी तीन आरोपींना भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय भाऊराव देरकर (वय 29 वर्ष), देवेंद्र सुखदेव राऊत (वय 23 वर्ष) आणि जगदीश उर्फ नेमाजी येवले (वय 23 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. हे तिघेही तुमसर तालुक्यातील ( Tumsar Taluka) परसवाडा (Parswada) येथील रहिवासी आहेत. हिरालाल लक्ष्मण हेडाऊ (Hiralal Hedau) (वय 65) असे मृत सावकाराचे नाव आहे. ही घटना नऊ वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडली. सावकाराचा खून करून गहाण ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
हिरालाल हेडाऊ हे परवानाप्राप्त सावकारी व्यवसाय करीत होते. 4 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळीच्या रात्री 10.30 वाजता ते एकटे घरी होते. त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्या घरातून सोने-चांदीने दागिने लंपास केले गेले होते. या प्रकरणी त्यांचा मुलगा अविनाश हिरालाल हेडाऊ यांनी सिहोरा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी घटनेचा गांभीर्याने या घटनेचा तपास केला. खून करून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने एकच खळबळ उडाली होती. खून करणाऱ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र, पोलिसांनी संजय, देवेंद्र आणि जगदीश या तिघांना अटक केली. घटनेचा तपास करून साक्षी पुरावे गोळा केले. हे प्रकरण विशेष सत्र न्यायालय भंडारा येथे सादर केले. साक्षी – पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला. आरोपी संजय देरकर, देवेंद्र राऊत आणि जगदीश येवले यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
कशी घडली घटना?
हिरालाल हेडाऊ हे सावकार होते. घरी एकटेच असताना तीन आरोपींनी त्यांच्या घरी रात्री प्रवेश केला. धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर सावकाराच्या घरचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. हिरालाल यांचा मुलगा याने सिहोरा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर संशयावरून आरोपींना अटक करण्यात आली. सबळ पुरावे सापडल्यामुळं कोर्टात त्यांना शिक्षा झाली. आता तिघांनाही जन्मभर कैदेत खडी फोडावी लागणार आहे.