अधिकाऱ्यांना पटवून देताना डोक्यावरचे केस उडून जातात, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला संताप
Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते भीडभाड न ठेवता कोणाचाही समाचार घेऊ शकतात. गडकरी यांनी भंडारा येथील अधिकऱ्यांवर चांगलेच भडकले. सोप्या पद्धतीने काम करण्याचे सरकारचे तंत्रच नाही हे त्यांनी टीकेतून अधोरेखित केले.
रुपेश सपाटे, प्रतिनिधी, भंडारा | 7 जानेवारी 2024 : ‘सरकारी काम आणि चार महिने थांबा’ ही म्हण काही उगीच आलेली नाही. ती अनुभवातून तावून सलाखून आलेली आहे. सर्वसामान्यांना तर त्याचा पदोपदी अनुभव येतो. पण जेव्हा दस्तूरखुद्द केंद्रीय नेत्यालाच या लालफितशाहीचा अनुभव येतो, तेव्हा त्याची बातमी होते. सर्वसामान्यांना चटके सहन करावे लागतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य म्हणजे वऱ्हाडातील झणझणीत ठेच्याप्रमाणे असतात. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जे चूक आहे ते त्यावर प्रतिक्रिया नोंदवितात. त्यावर शाब्दिक प्रहार केल्याशिवाय ते राहत नाहीत. भंडारा येथील रस्त्याच्या प्रकारणात सुद्धा त्याचा प्रत्यय आला.
सरकार हे तर विषकन्येसारखं
सरकार हे तर विषकन्येसारखं असते अशी मिश्किल टिप्पणी गडकरी नेहमी करतात. गॉड आणि गव्हर्मेंट या दोघांवर सर्वसामान्यांचा विश्वास असतो. पण ज्या कामात सरकारचा हस्तक्षेप होतो, सरकारची सावली पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, हे त्यांचे वाक्य एकदम लोकप्रिय आहे. सरकारी बाबूगिरीवर ते नेहमी आसूड ओढतात.
सरकारी अनास्थेवर ओढला आसूड
सरकार हे विषकन्येसारखं असतं, ज्या ठिकाणी सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो, सरकारी अधिकाऱ्यांना कन्व्हेन्स करता करता डोक्यावरील केस उडून जातात अशी उद्विग्न प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.भंडाऱ्यातील पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सरकारी अनास्थेवर पुन्हा आसूड ओढला.
काय आहे प्रकरण
भंडारा ते पवनी हा रस्ता हा केवळ वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या 12 वर्षांपासून बंद आहे. त्या ठिकाणच्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत घाला असंही ते म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले की, “सरकारच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचं नाही, मदतही घ्यायचं नाही. मी नेहमी गमतीनं म्हणतो की, सरकार विषकन्येसारखा आहे. जिथं सरकारची मदत मिळते तिथं तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना कन्व्हेन्स करता करता डोक्यावरचे केस उडून जातात.