सेवानिवृत्त शिक्षकानं संपविलं जीवन, भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?
दोन वर्षापूर्वी साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील प्राथमिक शाळेतून ते सेवानिवृत्त झाले.
तेजस मोहतुरे, Tv9 मराठी प्रतिनिधी, भंडारा : सेवानिवृत्तीनंतर सुखानं जीवन जगावं असं वाटतं. निवृत्त झाल्यानंतर कामाच्या व्यापातून माणूस मोकळा होतो, असं म्हणतात. पण, नंतर खऱ्या अर्थानं दुखणं सुरू होतं. शरीर साथ देत नाही. तर, कधी कुटुंबीय दुरावले जातात, अशावेळी नैराश्य येते. यातून काही जण टोकाचा निर्णय घेतात, अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात घडली. एका सेवानिवृत्त शिक्षकानं (Retired teacher) टोकाचा निर्णय घेतला. स्वतःला संपविलं. त्यामुळं शैक्षणिक (Educational) वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनंजय गणपत नागदेवे हे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. नागदेवे हे जिल्हा परिषद शिक्षक होते. परंतु, त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. लाखनी तालुक्यातील राजेगाव (मारेगाव) येथे ही घडली घडली. लाखनी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
दोन वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त
धनंजय नागदेवे हे भंडारा जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील प्राथमिक शाळेतून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर पत्नी मुलांसह लाखनी तालुक्यातील राजेगाव येथे राहत होते. घरी कुणी नसताना त्यांनी विष घेतले. हा प्रकार काही वेळानंतर लक्षात आला.
शैक्षणिक वर्तुळात खळबळ
मात्र तोपर्यंत धनंजय नागदेवे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सेवानिवृत्त शिक्षक धनंजय नागदेवे यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. या घटनेने लाखनी तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.