Bhandara Accident : ह्रदयद्रावक ! मोहफुल वेचायला गेले अन् घामाघाम झाले, कालव्यात उतरले तर काका-पुतण्याला मृत्यूने गाठले
जंगलात मोहफुल वेचायला काका-पुतणे गेले. मोहफुल वेचल्यानंतर गर्मी झाली. घामाघाम झाले. दोघेही हातपाय धुण्यासाठी कालव्यात उतरले. पण, या कालव्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
भंडारा : काका-पुतणे जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले. त्यानंतर कालव्यात उतरून हातपाय धुत होते. कालव्यात उतरणे त्यांच्या जीवावर बेतले. भंडारा जिह्यातील कारली (Karli) येथील लघुकालव्यात बुडून (drowning) या दोघांचा मृत्यू झाला. तुमसर (Tumsar) तालुक्यातील आसलपानी येथील हे दोघेही रहिवासी होते. साहील राजेश कोकोडे (वय 12 वर्ष) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (वय 24 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. सध्या मोहफुल वेचणीचा मोसम सुरू आहे. मोहफुल वेचणीतून रोजगार निर्मिती होते. दोन-तीन महिने हे काम चालते. मोहाच्या झाडाखाली पडलेली फुलं वेचायची. ती वाळवून मग विकायची. त्यातून पैसे मिळतात. ही मोहफुलं बैलांना खुराग म्हणून दिली जाते.
अशी घडली घटना
हौसीलाल व साहील जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परतताना वाढत्या तापमानामुळे घामाने भिजले. हातपाय धुण्यासाठी दोघेही कारली लघुकालव्यात उतरले. तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले. तेथे वाचवण्यासाठी कुणीही नव्हते. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
साहिल आश्रमशाळेत शिकत होता
घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर रुग्णालयात पाठविला. साहील हा येरली येथील आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिकत होता. तो आश्रमशाळेत जाणार होता. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे.