केंद्रीय तपास यंत्रणेकरवी थेट कारवाई करता, मग इथे पोलिसांनी साधी माहितीही घ्यायची नाही का, भुजबळांचा सवाल
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भाजप नवाब मलिक यांच्यावर अन्याय करत आहे. आम्ही परत राजीनामा घेऊन का अन्याय करू. आधी म्हणतात 55 लाख, नंतर म्हणता 5 लाख. दाऊद तर पाच लाखांचे पान खाऊन थुंकत असेल. मुस्लिम असल्याने नवाब मलिक यांच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
कोल्हापूरः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत. त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे. ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून थेट कारवाई करता आणि इथे पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का, असा सवाल रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला. राज्यभर गाजलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी (Pune police) नोटीस बजावल्याची चर्चा होती. मात्र, पोलीस बदल्यांचा अहवाल लीक केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. यावरून भाजपने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. आता या प्रकरणाच्या भाजपच्या भूमिकेवर भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पुराव्याची वाट पाहतोय
भाजप नेते नितेश राणे यांनी शरद पवारांचा संबंध दाऊदशी जोडला होता. ते म्हणाले होते की, अनिल देशमुख हिंदू असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला. मात्र, नवाब मलिक मुस्लीम असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला नाही. पवार हे दाऊदांचे माणूस आहेत, असा आरोप केला होता. निलेश राणे यांनीही आज सकाळी पवारांना दाऊदचा माणूस म्हटले. या वक्तव्याचाही छगन भुजबळ यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, 1994 पासून पवार साहेब आणि दाऊदचा संबंध जोडला जातोय. कोणीतरी याबाबत ट्रकभर पुरावे देणार होते. साहेब सुद्धा या पुराव्यांची वाट पाहत आहेत, अशी टिप्पण्णी त्यांनी केली. पुढे फडणवीस आणि राज्यपाल यांची भेट हा योगायोग असेल. आम्ही 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना भेटून पुन्हा एकदा विनंती करू, असा टोलाही त्यांनी हाणला.
मलिकांवर अन्याय
भुजबळ म्हणाले की, भाजप नवाब मलिक यांच्यावर अन्याय करत आहे. आम्ही परत राजीनामा घेऊन का अन्याय करू. आधी म्हणतात 55 लाख, नंतर म्हणता 5 लाख. दाऊद तर पाच लाखांचे पान खाऊन थुंकत असेल. मुस्लिम असल्याने नवाब मलिक यांच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पाच राज्यातील निवडणुकीत भाजपच्या जागा खूप कमी झाल्या आहेत. गोव्यात महाविकास आघाडी एकत्र राहिली असती, तर चित्र वेगळे असते. भाजपचा चढता सूर्य हळूहळू कमी होत चाललाय, असा दावाही त्यांनी केला.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?