Eknath Shinde Vs Uddhav Thackeray:एकनाथ शिंदे बंडात आता भाजपा सक्रिय, गुवाहाटीत शिवसेनेचे 42 आमदार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
आता पुढील घडामोडी आणि चर्चा दिल्ली आणि गुवाहाटीत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदेंशी पुढील चर्चा करुन, येत्या काही दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. त्यामुळे पुढची चर्चा आता दिल्ली आणि गुवाहाटीतून होईल अशी शक्यता आहे.

मुंबई – राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडात आता गुवाहाटी आणि दिल्लीतून पुढील हालचाली होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आता दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेसह अपक्ष असे 42आमदार सध्या गुवाहाटातील आहेत. आता उद्या या सगळ्यांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे (Governor)पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुढील घडामोडी आणि चर्चा दिल्ली आणि गुवाहाटीत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदेंशी पुढील चर्चा करुन, येत्या काही दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. त्यामुळे पुढची चर्चा आता दिल्ली आणि गुवाहाटीतून होईल अशी शक्यता आहे.
शिंदेंना 8 कॅबिनेट मंत्रिपदे, 5 राज्यमंत्रीपदाची ऑफऱ
एकनाथ शिंदे यांना भाजपाने मोठी ऑफर दिली असल्याची माहिती आहे. त्यात 8 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्रीपदे तसेच केंद्रीतही दोन मंत्रीपदे शिंदे यांना देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येते आहे. सध्या गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासकडे 42 आमदार आहेत. त्यांच्या या बंडाला पडद्याआडून भाजपाने मदत केल्याची चर्चा आहे. भाजपाचे मोहित कम्बोज हेही या आमदारांसोबत असल्याचे सांगण्यात येते आहे. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांचेही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असण्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र हा पुढच्या निवडणुकांसाठी भाजपासाठी महत्त्वाचा आहे.



पुढे काय होणार?
एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे स्वतंत्र गटाचा दावा केल्यानंतर, सरकारमधून ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपा राज्यपालांकडे करु शकते. त्यानंतर राज्यपाल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरीच्या काळात राजीनामा दिला तर मग लगेचच भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशा स्थितीत शिंदे यांना त्यांच्यासोबतच्या बंडखोरांना सांभाळण्याचे आव्हान असणार आहे. जितक्या दिवस हे बंड लांबेल तितके भाजपा आणि शिंदेंना सरकार स्थापन करणे अवघड होईल, अशी चर्चा आहे.