आपली काँग्रेस झाली का? भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे शोभा फडणवीस यांनी टोचले कान
BJP 46th Foundation Day: मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले. एकाच शहरात भाजपच्या स्थापना दिनाचे दोन कार्यक्रम का घेतले? आपली काँग्रेस झाली का?

BJP 46th Foundation Day: चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम झाले. माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला. तसेच स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभाताई फडणवीस- हंसराज अहीर यांच्यासोबत कार्यक्रम घेतला. एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्यामुळे भाजपमधील दुफळी समोर आली आहे. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले आहे.
देशाच्या राजधानीत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भाजपच्या 2 ते 240 चे गुणगान करत असताना चंद्रपूर शहरात मात्र भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींनी स्थापना दिनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले. माजी पालकमंत्री आणि दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात घेतला. त्यांनी पक्षाच्या जुन्या- जाणत्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक संघर्षामुळे आजचा दिवस दिसल्याचे म्हटले. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रारंभीच्या काळात पक्षासाठी वणवण फिरलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजप आपला स्थापना दिन तारखेवर साजरा करतो, यंदा योगायोगाने रामनवमी आली हे लक्षात आणून दिले.
भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटाने स्वतंत्र स्थापना दिन सोहळा साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची मंचावर उपस्थिती होती. ज्येष्ठ नेत्या शोभाताई यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात पक्ष रुजवण्यासाठी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुनगंटीवार समर्थक सहभागी नसल्याविषयी विचारल्यावर आ. जोरगेवार यांनी आज कार्यक्रमांची संख्या अधिक असल्याने अन्यत्र गेले असावेत अशी प्रतिक्रिया दिली.




यावेळी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले. एकाच शहरात भाजपच्या स्थापना दिनाचे दोन कार्यक्रम का घेतले? आपली काँग्रेस झाली का? चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराने कार्यक्रम ठेवला होता. सर्वांनी मोठेपण देऊन त्यांच्या कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते, असे शोभा फडणवीस यांनी म्हटले.