नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा
राजकीय वर्तुळात नारायण राणे यांना केंद्रात बढती मिळणार, असल्याची चर्चा सुरु झाली आहे. | Amit Shah Narayan Rane
कणकवली: भाजप खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे रविवारी कणकवलीत दाखल झाले. यानिमित्ताने आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांना केंद्रात बढती मिळणार, असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मोदी सरकारकडून लवकरच केंद्रातील रिक्त मंत्रीपदे भरली जाणार आहेत. यामध्ये नारायण राणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (Amit Shah in Konkan for inauguration of Narayan Rane Medical colleage)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह हे भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. भाजपला देशभरात यश मिळण्यात मोदींइतकाच अमित शाहा यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासारख्या व्यक्तीने नारायण राणे यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात येणे, ही मोठी बाब आहे. सध्या शेतकरी आंदोलन आणि इतर बाबींमुळे गृहमंत्री असलेले अमित शाह अत्यंत व्यग्र असतात. मात्र, या सगळ्या कामकाजातून अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कार्यक्रमासाठी दोन तासांचा वेळ काढणे, हे एकप्रकारचे संकेत आहेत.
त्यामुळे पक्षश्रक्षेष्ठी नारायण राणे यांच्यावर खुश असून नारायण राणे यांना लवकरच बढती मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणात भाजपला लक्षणीय यश मिळाले होते. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाचा फायदा होऊ शकतो. याशिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात असलेला 36 चा आकडा पाहता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून नारायण राणे यांचा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो.
तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का; नारायण राणे खुर्चीतून मागे वळून म्हणाले….
काही दिवसांपूर्वी एका पत्रकारपरिषदेत नारायण राणे यांना तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा खुर्चीत बसलेल्या नारायण राणे यांनी मागे वळून पाहिले. त्यानंतर तुम्ही हा मला प्रश्न विचारलात का, असेही विचारले. मला याबाबत काही माहिती नाही. पण तुमच्या तोंडात साखर पडो, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार
(Amit Shah in Konkan for inauguration of Narayan Rane Medical colleage)