VIDEO | पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी परळीत दीपोत्सव, वैद्यनाथ मंदिर परिसरात पणत्या उजळल्या
परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य पणत्या लावल्या. यामुळे मंदिर परिसर अक्षरशः उजळून निघाला होता.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा काल वाढदिवस झाला. वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी न करता “एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ” हा उपक्रम राबवण्याचं आवाहन पंकजांनी केलं होतं. यालाच प्रतिसाद देत बीडमध्ये परळीत प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पणत्या लावून दीपोत्सव केला. आपल्या लाडक्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
परळीत या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येऊन तिथल्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य पणत्या लावल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता.
पाहा व्हिडीओ :
दुसरीकडे, पंकजा मुंडेंना सोशल मीडियावर खास पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये चढाओढ लागली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त भाजपच नव्हे, तर इतर पक्षातील नेत्यांकडूनही शुभेच्छा दिल्या गेल्या प्रख्यात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनीही ट्विटरवरुन पंकजांना शुभेच्छा दिल्या.
“भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी केले. त्यावर “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिली. त्याला “कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे” असं उत्तर उर्मिला यांनी दिलं.
प्रीतम मुंडेंकडून अनोख्या शुभेच्छा
पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी प्रीतम मुंडेंनी फेसबुक आणि ट्विटर अशा दोन्ही माध्यमांचा वापर केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.
तीन फोटो आणि त्यांची गोष्ट
पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. तिन्ही फोटोत दोघी बहिणी आहेत. यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे. तर प्रीतम मुंडे बाजूला बसून हसत आहेत. त्यांच्या मांडीत एक बाहुलीही आहे. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींनी सारखाच ड्रेस घातला आहे.
दुसरा फोटो त्यांचा अलिकडच्या काळातला आहे. यात दोन्ही बहिणी व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्यात काहीतरी संवाद सुरु आहे. त्यातही पंकजा प्रीतम यांना काही तरी सांगत आहेत आणि ते त्या मन लावून ऐकताना दिसत आहेत. तिसरा फोटो हा पुन्हा एका व्यासपीठावरचाच आहे. बहुतेक तो दसरा मेळाव्यातला असावा. इथेही पंकजा बोलत आहेत आणि प्रीतम मुंडे गर्दीकडे बघत असतानाच ऐकत असल्याचं दिसतं.
संबंधित बातम्या :
तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस, प्रीतम मुंडेंच्या पंकजांना खास फोटो शेअर करत शुभेच्छा
उर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला…
(BJP Leader Pankaja Munde Birthday celebrated by lighting in Parali Beed Vaidyanath Temple)