उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा
यात्रेच्या (BJP Mahajanadesh Yatra) उद्घाटनाला भाजपाध्यक्ष अमित शाह आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दोन टप्प्यात होणाऱ्या या यात्रेत एकूण 4384 किमीचा प्रवास होईल.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश (BJP Mahajanadesh Yatra) यात्रेला 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरुवात होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. यात्रेच्या (BJP Mahajanadesh Yatra) उद्घाटनाला भाजपाध्यक्ष अमित शाह आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दोन टप्प्यात होणाऱ्या या यात्रेत एकूण 4384 किमीचा प्रवास होईल. यात्रेची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांच्यावर देण्यात आली आहे.
उद्घाटनाला सर्व मंत्री उपस्थित असतील. पहिला टप्पा मोझरीतून 1 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 9 ऑगस्ट रोजी समारोप होईल. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 57 विधानसभा मतदारसंघातून 1639 किमीचा प्रवास केला जाईल. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबारमध्ये केला जाईल.
यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरु होईल. यात 18 जिल्हे आणि 93 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2745 किमी प्रवास केल्यानंतर यात्रेचा समारोप नाशिकमध्ये 31 ऑगस्टला केला जाईल.
महाजनादेश यात्रेचं वैशिष्ट्य
पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडण्यासाठी मतदारांची भेट
या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी देण्याचं आवाहन
एकूण 32 जिल्ह्यात 4384 किमी प्रवास, दोन्ही टप्प्यात मिळून 150 मतदारसंघांना भेट
या काळात 87 मोठ्या सभा, 57 स्वागत सभा आणि 238 गावांमध्ये स्वागत समारंभ होईल.
विदर्भात 1232 किमी (44 मतदारसंघ)
उत्तर महाराष्ट्रात 622 किमी (34मतदारसंघ)
मराठवाड्यात 1069 किमी (28 मतदारसंघ)
पश्चिम महाराष्ट्रात 812 किमी (29 मतदारसंघ)
कोकणात 638 किमी (15मतदारसंघ)
पाच वर्षातील काम सांगणारा एलईडी रथ सोबत असेल
ज्या जिल्ह्यात यात्रा जाईल तेथील सर्व मंत्री, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील.