भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, किती महिलांना मिळालं तिकीट?
भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट यावेळी कापण्यात आलं असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या यादीचं वैशिष्ट म्हणजे अनेक ठिकाणी पक्षानं विद्यामान आमदारांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या यादीमध्ये किती महिलांना संधी?
भाजपकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. 99 मध्ये 13 मतदारसंघात पक्षाकडून महिलांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. ज्यामध्ये चिखली, भोकर, जिंतूर, फुलंब्री, नाशिक पश्चिम, कल्याण पूर्व, बेलापूर. दहिसर, गोरेगाव, पर्वती, शेवगाव, श्रीगोंदा आणि केज या मतदारसंघाचा समावेश आहे.
चिखली मतदारसंघातून श्वेता विद्याधर महाले, भोकरमधून भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंब्रीमधून अनुराधाबाई अतुल चव्हाण नाशिक पश्चिम सीमाताई महेश हिरे, कल्याण पूर्व सुलभा गायकवाड, बेलापूर मंदा म्हात्रे दहिसर मनिषा चौधरी, गोरेगाव विद्या ठाकूर, पर्वती – माधुरी सतिश मिसाळ, शेवगाव मोनिका राजीव राजळे, श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते आणि केजमधून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे.
भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी
भोकरमधून श्रीयजा चव्हाण यांना भाजपनं विधानसभेचं तिकीट दिलं आहे. श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेत खासदारकी देण्यात आली. तर आता त्यानंतर विधानसभेत त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.