महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपाचा कुटील डाव, नाना पटोलेंचा घणाघात
नारायण राणे हे वारंवार मुख्यमंत्र्यांचा ऐकरी उल्लेख करतात, मुख्यमंत्रिपदाचा मान राखला पाहिजे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारमधील राज्यातील मंत्री केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे काम करत आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. भारतीय जनता पक्ष राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे, परंतु यात भाजपाला यश येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेय.
नारायण राणे यांचे वक्तव्य अशोभनीय
यांसदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवली असती’ हे नारायण राणे यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. नारायण राणे हे वारंवार मुख्यमंत्र्यांचा ऐकरी उल्लेख करतात, मुख्यमंत्रिपदाचा मान राखला पाहिजे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारमधील राज्यातील मंत्री केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे काम करत आहेत.
मोदी सरकारने 7 वर्षात काय केले?
केंद्र सरकारने सात वर्षात कोणतेही काम केले नाही. त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही त्यामुळेच अशी बेताल वक्तव्ये करून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकारने 7 वर्षात काय केले हे जनतेला सांगावे परंतु तसे न करता लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपाचे हे मंत्री करत आहेत.
पोलीस कायद्याप्रमाणे त्यांचे काम करतील
नारायणे राणे यांच्या वक्तव्याबद्दल पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस कायद्याप्रमाणे त्यांचे काम करतील, राज्यातील जनतेने मात्र भाजपाचा हा कुटील हेतू ओळखावा व राज्यातील शांततेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.
ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते तर आता दुसरे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. विरोधी पक्षांबदद्ल राजकीय मतभेद असतात ते वैचारिक पातळीवरचे असतात. विरोधक म्हणजे शत्रू नाहीत हे भाजपाला समजले पाहिजे.
संबंधित बातम्या:
राणेंच्या अटकेवर भाजप हायकमांडची पहिली प्रतिक्रिया, ना हम डरेंगे, ना दबेंगे!
BJP’s insidious move to make Maharashtra West Bengal: Nana Patole