मुंबईसह राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा!, रक्तदान करा, सरकारचं आवाहन
मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. अशावेळी राज्यासमोर अजून एक आव्हान उभं राहिलंय. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तसंच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Blood shortage in the state including Mumbai)
कोरोना काळात राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात यावं, असंही शिंगणे यांनी म्हटलंय.
तूर्तास लॉकडाऊन नाही
राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी गुरुवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांनी सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
बुधवारी राज्यात कोरोनाचा विस्फोट
राज्यात काल दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 81 लाख 2 हजार 980 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE : Maharashtra second Lockdown : तूर्तास लॉकडाऊन नाही, पण वाटचाल त्याच दिशेने : राजेश टोपे
सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
Blood shortage in the state including Mumbai