‘वेडेवाकडे विधान करुन सरकारला अडचणीत आणू नका’, अजित पवारांनी शिवसेनेचे संजय गायकवाड यांचे टोचले कान
"वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते?", असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीचं सरकार अडचणीत आलं होतं. अखेर याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुलढाण्यातच संजय गायकवाड यांचे भर मंचावर कान टोचले. पण अजित पवारांनी संजय गायकवाड यांचं नाव घेतलं नाही. तरीही त्यांचा रोख संजय गायकवाड यांच्याकडे होता हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत. महायुतीचा बुलढाण्यातच आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाच, त्यासोबत त्यांनी संजय गायकवाड यांचेदेखील कान टोचले.
“विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या बहिणींनी, माझ्या मायमाऊलींनी धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ हे चिन्हं जिथे असतील ते बटण दाबा. या योजना पुढचे पाच वर्षे चालू राहतील, असा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवाराचा वादा आहे. मी खोटं बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, आपल्याला पैसे द्यायचे आहेत. मी काल 4600 कोटींच्या चेकवर सही करुन आलो आहे. सातत्याने दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. उद्या भाऊबिजलाही तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्ही काळजी करु नका”, असं अजित पवार म्हणाले.
“तुम्ही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडून नका. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी चुकीचं सांगितलं की, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सवलती काढणार, समान नागरी कायदा आणणार. पण ते खोटं होतं. पण काहींनी विश्वास ठेवला. त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली. तो तुमचा अधिकार आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण आता आरक्षणाबद्दल कोण बोलतंय? कशापद्धतीची वक्तव्ये आली? कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली? याचा विचार केला. तुम्ही समंजस आहात”, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर नाव न घेता टीका करण्यास सुरुवात केली.
“घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गरिब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याकरता आरक्षण दिलं. ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता. ही महाराष्ट्रामधील पद्धत आहे? ही देशामधील पद्धत आहे?”, अशी टीका अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी संजय गायकवाड यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.
अजित पवारांनी संजय गायकवाडांचे टोचले कान
“मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, विचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाडाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते?”, असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.
“सुसंस्कृत महाराष्ट्र कशी असली पाहिजे ते यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं आहे. त्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. भाषा कसली पाहिजे? तर उद्या कुणी आपल्यावर टीका करायला नकोय. बोलताना अनेक प्रकारचे शब्दप्रयोग करता येतात. त्यामुळे महायुतीचं सरकार त्या विचारांचं आहे. जर कुणी एखाद दुसरं काही बोलून गेलं तर त्याला महायुती सरकारचा पाठिंबा आहे, असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी जाहीरपणे सांगू इच्छितो”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.