Buldana Jobs | रोजगार निर्मितीत बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल, 10 लाख रोजगाराच्या संधी केल्या उपलब्ध
युवक-युवतींनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतलाय. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मिती करण्यात बुलडाणा जिल्हा उद्योग केंद्र पश्चिम विदर्भातून अव्वल (Top in Vidarbha) ठरला आहे.
बुलडाणा : खरंतर अनेक तरुण – तरुणी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावतात. परंतु आपला वेळ खर्ची घालूनही अनेक तरुण-तरुणींना नोकरीमध्ये अपयश मिळते. आणि ते हताश होतात. मात्र आता या सर्वच तरुण आणि तरुणींना आपला स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी बुलडाणा जिल्हा उद्योग केंद्र (District Industries Center) पाठीशी उभे आहे. या तरुणांना खंबीरपणे आपल्या पायावर उभे करण्यासाठी बुलडाणा जिल्हा उद्योग कार्यालय (District Industries Office) पश्चिम विदर्भातून अव्वल ठरले आहे. या कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्ट्यापैकी दुपटीपेक्षाही जास्त उद्दिष्ट पूर्ण केले आहे. युवक-युवतींनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतलाय. त्याच अनुषंगाने गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मिती करण्यात बुलडाणा जिल्हा उद्योग केंद्र पश्चिम विदर्भातून अव्वल (Top in Vidarbha) ठरला आहे.
दुपटीपेक्षा जास्त प्रकरणे मंजूर
या कार्यालयाने अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या चार जिल्ह्यांना मागे टाकत, उद्दिष्टांपेक्षा अधिक कर्ज प्रकरणे मंजूर केली. शेकडो तरुणांच्या हातांना रोजगार दिलाय. 2020 – 21 या वर्षांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्याला 42 प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले. परंतु त्या उद्दिष्टांच्या दुपटी पेक्षाही जास्त म्हणजे 99 प्रकरणे मंजूर करण्यात आली. 2021 – 22 या वर्षामध्ये 54 प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 90 प्रकरणांना मंजुरात दिली आहे. असे दोन वर्षात एकूण 480 रोजगारनिर्मिती जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रोजगाराच्या बाबतीत पुढारला
एकंदरीत जर का विचार केला, तर बुलडाणा जिल्हा सर्वच बाबतीत मागासलेला म्हणून ओळखला जातो. मात्र कार्यालयामार्फत होत असलेली उद्योग आणि रोजगारनिर्मिती पाहता येत्या काळात हा कलंक पुसला जाणार आहे, असं मत बुलडाणा जिल्हा उद्योग कार्यालयाचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी व्यक्त केले. रोजगाराच्या बाबतीत गेल्या पाच वर्षांमध्ये बुलडाणा जिल्हा सुधारला आहे.