Prataprao Jadhav : फोटो काढला किंवा लावला म्हणून कुणाचं महत्त्व कमी होत नसतं, प्रतापराव जाधवांचं मत; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर मात्र टीका
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पक्ष नेतृत्वाच्याही काही चुका आहेत. मात्र आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. वाद निर्माण होऊ नये असे शिवसैनिकांनी वागले पाहिजे, असे प्रतापराव जाधव म्हणाले.
पुणे : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ज्या त्वेषाने, आक्रमकपणे बोलत आहेत, गद्दार म्हणत आहेत, राज्याचा दौरा करत आहेत, हे आधीच केले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका बुलडाण्याचे खासदार आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. नवी दिल्लीत त्यांनी टीव्ही 9सोबत संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. हे सर्व अडीच वर्षाआधीच केले असते, आमदार, खासदारांना भेटले असते तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती. गद्दार आम्हाला म्हटले जात आहे. मात्र जनता ठरवेल कोणाची भूमिका योग्य आहे आणि कोणाची नाही, असे ते म्हणाले. तर विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, असे म्हणत उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झालेल्या घटनेचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटनेवर दिली. तर फोटो काढल्याने कुणाचे महत्त्व कमी होत नसते, असेही ते म्हणाले.
‘पक्ष नेतृत्वाच्याही काही चुका’
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पक्ष नेतृत्वाच्याही काही चुका आहेत. मात्र आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. वाद निर्माण होऊ नये असे शिवसैनिकांनी वागले पाहिजे. मी माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरेंचा फोटो तसाच ठेवला आहे. कारण एवढी वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केले आहे. फोटो काढला म्हणून किंवा यापेक्षा कोणाचा मोठा फोटो लावला म्हणून महत्त्व कमी होत नसते आणि फोटो काढण्याचे काही कारण नाही. मात्र आता आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, असे प्रतापराव जाधव म्हणाले.
आदित्य ठाकरे विरुद्ध बंडखोर
आदित्य ठाकरे यांचा सध्या राज्यभर दौरा सुरू आहे. कोकण, मराठवाडा यानंतर काल ते पुण्यात होते. या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. यावेळी आक्रमक भाषण करताना बंडखोरांना ते गद्दार संबोधत आहेत. यावर शिंदे गटाचा आक्षेप असून आम्ही गद्दार नसल्याचे ते म्हणत आहेत. तुमच्यामध्ये दम असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानही आदित्य ठाकरे देत आहेत. मैदानात उतरा, मग कळेल शिवसेना कुणाची आहे, असेही थेट आव्हान ते देत आहेत. तर आता बंडखोर नेतेदेखील आदित्य ठाकरे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत