Buldana NCP | राज ठाकरेंनी भूमिका बदलली, भाजपचे वकीलपत्र घेतल्यासारखे वागतात; बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांची टीका
राज ठाकरे हे नेहमी आपली भूमिका बदलत असतात. सध्या त्यांनी वाद निर्माण करण्याचं काम केलंय. भोंग्याच्या विषयाला हात घालून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यांना भोंग्यावर बोलायचा अधिकार कुणी दिला, राजेंद्र असंही शिंगणे म्हणाले. राज ठाकरे यांच्या बोलण्यावरून सद्या त्यांनी भाजपचे वकीलपत्र घेतलंय की, काय अशी शंका येत असल्याचं ते म्हणाले.
बुलडाणा : सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी सुद्धा राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे यांची दोन वर्षांपूर्वीची भूमिका आणि आजची भूमिका यात फरक आहे. त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. भाजपचे वकीलपत्र घेतले असल्यासारखे राज ठाकरे वागतायेत, असा घणाघात शिंगणे यांनी केलाय. तर तुम्हाला मंदिर, मस्जिदवरील भोंगे काढण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल ही शिंगणे यांनी राज ठाकरे यांना केलाय.
कार्यकर्ते केसेस करतील, हे घरी बसतील
भोंगे काढा म्हणणारे दोन समाजात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका म्हणत ठाकरे स्वतः भोंगे काढायला मंदिर किंवा मस्जिदमध्ये जाणार नाहीत. कार्यकर्ते जातील. अंगवार केसेस करतील आणि हे बसतील सुरक्षेत घरी, अशी टीकाही शिंगणे यांनी ठाकरे यांच्यावर केलीय. खामगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छोटेखानी कार्यक्रमात शिंगणे बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतलाय.
काय म्हणाले होते राज ठाकरे
भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो. त्यामुळं भोंगे काढले पाहिजे. तुम्ही भोंगे काढत नसाल तर आम्ही भोंगे लावू. त्याठिकाणी हनुमान चालीसा म्हणू. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली. त्यामुळं राजेंद्र शिंगणे यांनी आता त्यावर उत्तर दिलंय. राज ठाकरे हे नेहमी आपली भूमिका बदलत असतात. सध्या त्यांनी वाद निर्माण करण्याचं काम केलंय. भोंग्याच्या विषयाला हात घालून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यांना भोंग्यावर बोलायचा अधिकार कुणी दिला, राजेंद्र असंही शिंगणे म्हणाले. राज ठाकरे यांच्या बोलण्यावरून सद्या त्यांनी भाजपचे वकीलपत्र घेतलंय की, काय अशी शंका येत असल्याचं ते म्हणाले.