Buldana Crime : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संतोष रनमोडेला अटक, 42 लाखांची रक्कम जप्त, बुलडाणा पोलिसांची कारवाई
चिखली तालुक्यासह परिसरातील पाचशेच्यावर शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी संतोष संतोष रनमोडेने खरेदी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना खोटे चेक देऊन संतोष रनमोडे फरार झाला होता.
बुलडाणा : बुलडाणा पोलिसांनी उस्मानाबाद (Osmanabad) येथे मोठी कामगिरी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संतोष रनमोडेला अटक केली. त्याच्याकडून 42 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातून जास्त दराने धान्य खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे दिले नव्हते. जवळपास तीन कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य त्याने खरेदी केले होते. पैसे न देता संतोष रनमोडे (Santosh Ranmode) हा फरार झाला होता. संतोष रनमोडे यास बुलडाणा पोलीस पथकाने परंडा पोलिसांच्या (Paranda Police) मदतीने बावची येथून अटक केली. त्याच्याकडून 42 लाख रुपयांची रक्कम कड व कार जप्त केली आहे. चिखली, बुलडाणासह परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीन आणि शेतमाल जादा दराने खरेदी केले होते. याबदल्यात खोटे चेक देऊन शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी चुना आरोपी संतोष रनमोडेने लावला होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबादवरून रनमोडेला अटक केलीय.
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व्यापारी संतोष रनमोडेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून फसवणूक केल्यावर अनेक नेते, शेतकरी संघटनांनीसुद्धा आरोपीला अटक करावी आणि पैसे द्यावे, अशी मागणी केली होती. अखेर चिखली पोलिसांनी आरोपी संतोष रनमोडे विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथके नियुक्त केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रनमोडेच्या मार्गावर होते. त्याच्या ताब्यातून 42 लाख रुपयांची रक्कम जप्त केली. पोलिसांना अजून बरीच रक्कम त्याच्या ताब्यातून हस्तगत करायची आहे.
281 शेतकऱ्यांच्या तक्रारी
चिखली तालुक्यासह परिसरातील पाचशेच्यावर शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी संतोष संतोष रनमोडेने खरेदी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना खोटे चेक देऊन संतोष रनमोडे फरार झाला होता. शेतकऱ्यांच्या लक्षात येताच याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात 120 तर चिखली पोलीस ठाण्यात 161 अशा 281 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. फसवणूक झालेले शेतकरी जर समोर आले तर हा आकडा जवळपास 20 कोटींच्यावर जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. चिखली पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारीनुसार 3 कोटी 41 लाख 42 हजार फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. चिखली पोलिसांनी 18 जून 2022 ला पवित्रा ट्रेडिंग कंपनीचा मालक संतोष बाबुराव रनमोडे आणि साथीदार अशोक म्हस्के, निलेश साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.