या कारणामुळे जिल्हा परिषद शाळा भरते हनुमान मंदीरात, शिक्षकांनी सांगितलं कारण
बुलढाणा जिल्ह्यात शाळा भरते हनुमान मंदीरात अशी खंत पालक आणि शिक्षक सांगत आहेत. मुलांना व्यवस्थित शिक्षण देता येत नसल्यामुळे तक्रार कोणाला द्यायची असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : मोताळा (Motala) तालुक्यातील खांडवा (Khandawa) येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क गावातील हनुमान मंदिरात (hamuman temple) भरत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. खांडवा येथील जिल्हा परिषदेची शाळा जूनी झालेली असून शाळेची भिंत पडली आहे. तर बाकी भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत बसायला भीती वाटते, तर पावसाचे पाणी सुद्धा शाळेत गळते, परिणामी आता शाळा चक्क हनुमान मंदीरात भरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
खांडवा येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असून वर्ग एक ते चार वर्ग बसतील अशी शाळा तिथं आहे. त्याठिकाणी जुन्या काळी बांधलेल्या तीन वर्ग खोल्या असून त्या खोल्या अजीर्ण झालेल्या असल्याचं शिक्षक सांगत आहेत. त्यातील एका खोलीची भिंत काही दिवसांपूर्वी पडली आहे. राहिलेल्या खोल्यांची भिंतीला तडे गेलेले आहेत. त्यासुद्धा पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील हनुमान मंदीरात शाळा भरवली जात असल्याचं शिक्षक सांगत आहेत.
ज्यावेळी भिंत पडली, त्यावेळी वर्गात कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा मोठी घटना घडली असती. गावातील 50 ते 60 विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत.
आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळा चांगली आणि व्यवस्थित बांधून मिळावी, यासाठी शाळा समितीने अनेक वेळा पंचायत समितीकडे आपलं म्हणणं मांडलं. परंतु शिक्षण विभाग त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचं गावकरी सांगत आहेत.
सध्या ज्या ठिकाणी शाळा भरली जात आहे, ते ठिकाणी गावातील हनुमान मंदीर आहे. तिथं सुध्दा चार बाजूनी पावसाचं पाणी आतमध्ये येत आहे. जोरात पाऊस आल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बसायला जागा नसते. त्यामुळे पालकांनी, ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी शाळा तात्काळ बांधून द्यावी अशी मागणी केली आहे.