निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुभांगी पाटील यांनी निकाल सांगितला, राजकीय गणितंही सांगितलं, काय म्हणाल्या शुभांगी पाटील
कुणी कुणाचा वारसा सांगत होते, मी संघर्षाचा वारसा सांगत होते म्हणत सत्यजित तांबे यांना शुभांगी पाटील यांनी टोला लगावत विजयाचा पुन्हा दावा केला आहे.
चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राज्यातील पाच विभागाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये पाच विभागापैकी सर्वाधिक लक्ष हे नाशिक विभागाकडे लागून आहे. नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या रस्सीखेच बघायला मिळणार आहे. सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेस सोबत दुरावा करून भाजपशी जवळीक केलीय तर दुसरीकडे भाजपची साथ सोडून शुभांगी पाटील या महाविकास आघाडीला जाऊन मिळाल्या आहेत. त्यामुळे नाशिक विभागाची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर आज अखेर मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
माध्यमांपासून दूर राहिलेले सत्यजित तांबे तर माध्यमांसमोर जाऊन विजय माझ्याच होणार असा दावा करणाऱ्या शुभांगी पाटील यांच्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
ही लढत जनतेची होती, जनतेची आणि महिलांचा कौल शुभांगी पाटील यांच्याच बाजूने होता, जनतेने निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे शुभांगी पाटीलच विजयी होणार असं स्वतः उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी दावा केला आहे.
मतदारांचा मोठा आत्मविश्वास होता, इथे बूथ नाही तिथे बूथ नाही असे कधी घडलेच नाही, मी बूथ लावण्याऐवजी जनतेने बूथ लावले होते असा टोला शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना लगावला आहे.
मला कुणी चणे देत होते, कुणी फुटाणे देत होते आणि म्हणत होते तू पुढे चालत राहा तू थांबू नको, जनता मला भेटण्यासाठी रस्त्यावर येत होती, त्यामुळे जनतेचा विजय होणार असेही शुभांगी पाटील यांनी म्हंटले आहे.
शिक्षक, पदवीधर, वकील आणि विद्यार्थ्यांचे मी प्रश्न सोडविले होते, आमदार नसतांना मी प्रश्न सोडविले होते, त्यामुळे जनतेला विश्वास आहे विजय आपलाच होणार आहे.
कोण कुणाचा वारसा सांगत होते, पण मी संघर्षाचा वारसा सांगत होते. त्यामुळे विजय नक्की शुभांगी पाटीलचाच होईल, फक्त घोषणा बाकी आहे असेही शुभांगी पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
मतदान कमी झाले असले तरी महिलांचे विक्रमी मतदान झाले आहे. मतपेटीत फक्त शुभांगी पाटीलच दिसेल, फक्त औपचारिकता बाकी आहे असेही शुभांगी पाटील यांनी म्हंटलं आहे.