मराठा आरक्षणासाठी संवैधानिक तरतूद करा; अशोक चव्हाण यांची केंद्राकडे मागणी
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. (Center should make constitutional provision for Maratha reservation : Ashok Chavan)
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांना विनंती करावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.
सर्वोच्च न्यायालयातील एसईबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका जवळपास मान्य झाल्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 8 ते 18 मार्चपर्यंतच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 1 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्षपणे होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्ष रूपात होईल, अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
एसईबीसी आरक्षण प्रकरणामध्ये 18 मार्च रोजी अॅटर्नी जनरल यांनी भूमिका मांडावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. केंद्र सरकारसाठी ही एक चांगली संधी आहे. अॅटर्नी जनरल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अनुकूलता दर्शवली तर त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष राहणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
व्हिडीओ पाहा
Video | Ajit Pawar | मराठा आरक्षणासह शेतकरी आंदोलनावर अजित पवारांचं सुचक वक्तव्य@AjitPawarSpeaks #MarathaReservation #FarmersProtest #AjitPawar pic.twitter.com/9IBtaN1Esf
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांप्रमाणे हिंसक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?; विनायक मेटेंचा संतप्त सवाल
Maratha Reservation | मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 8 मार्चला होण्याची शक्यता
सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक, 7 फेब्रुवारी रोजी राज्यभर एल्गार; चव्हाणांच्या घरासमोरही आंदोलन
(Center should make constitutional provision for Maratha reservation : Ashok Chavan)