Nitesh Rane : नितेश राणे यांनी सर्वात आधी मंत्री व्हावं!, पण…; कुणी दिला सल्ला?
Nitesh Rane : नितेश राणे यांना मंत्री होण्याचा सल्ला कुणी दिला? म्हणाले, नितेश राणे यांनी सर्वात आधी मंत्री व्हावं! नारायण राणे यांच्यावर या नेत्यांना टीकास्त्र डागलंय. तसंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असंही ते म्हणालेत. वाचा सविस्तर...

चंद्रपूर | 27 सप्टेंबर 2023, निलेश दहाट : मी नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आलो. मी येथेच थांबलो मात्र त्यांचा हेतू तेव्हाच वेगळा होता. मी मंत्रीपद घेणार असल्याच्या नितेश राणे यांनी वावड्या उठवू नयेत. नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावं. माझ्या मंत्रिपदाची प्रतीक्षा करू नये. काँग्रेस पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. मात्र राणेंनी सतत भूमिका बदलल्या आहेत. मी कुठल्याही चॉकलेटला भुलणारा नाही. हे राज्य अधोगतीकडे जात असताना मी ठामपणे जनतेच्या बाजूने उभा राहील. मी काँग्रेससोबतच आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
पंकजा मुंडे या काल टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. तेव्हा मुलाखतीत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाताई मुंडे ओबीसी समाजाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांना सध्या असलेल्या पक्षात राम वाटत नसेल तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. त्याच स्वतःची राजकीय दिशा ठरवतील, असं ते म्हणालेत.
मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतही काम केलं आहे. त्यांच्या अनेक सभांमध्ये सोबत होतो. भाजपला पक्षातील ओबीसी नेतृत्व संपवायचं आहे.यांनी केवळ ओबीसींचा सत्तेसाठी वापर केला आहे. मनुवादी संस्कृती असलेल्या भाजपला ओबीसी नेते रुचत नाहीत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाई हेच दर्शवते आहे. निर्णय पंकजाताईंनी घ्यायचा आहे, असंही वडेट्टीवार म्हणालेत.
चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसी अन्नत्याग आंदोलनस्थळी जात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत यासंबंधी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला विजय वडेट्टीवार यांच्यासह सक्रीय आंदोलनकर्त्यांना निमंत्रण नसल्याने वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत केवळ भाजपचेच ओबीसी नेते बोलावल्याने कोणीही या बैठकीला जाऊ नये. त्यावर बहिष्कार घालावा अशी भूमिका मांडली. या प्रश्नावर मराठा आंदोलनासारखी सर्वपक्षीय ओबीसी बैठक का बोलावली नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. सरकारला हा प्रश्न सोडवायचाच नसून ओबीसी प्रश्नावर सरकार पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
