राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडणार होते, तेव्हा भुजबळांचा सल्ला ऐकला…छगन भुजबळ यांनी सांगितला पडद्यामागील किस्सा
आज अनेक वर्षांनी दोन्ही नेते एकत्र आले तर माझासारखा आनंद कोणाला होणार नाही. मी वेगळ्या पक्षात असलो तरी शिवसेनेसोबत माझे प्रेम कमी झालेले नाही. राजकारण एकीकडे आणि कुटुंब वेगळे असणे गरजेचे आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात विविध पक्षाकडून अन् नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील किस्सा सांगितला. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपण दोन्ही भावांना फोन करुन सल्ला दिला. तो सल्ला त्यांनी ऐकला, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांना जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भुजबळ म्हणाले, बाळासाहेबांसोबत काम करणारे आम्ही आहोत. राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला खूप आनंद होईल. मी शिवसेना सोडल्यानंतर बारा वर्ष कोणाशी बोललो नव्हतो. परंतु राज ठाकरे शिवसेनेतून जात असल्याचे कळल्यावर त्यावेळी मी स्वत:हून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यांना सांगितले माझे ऐका, आठ दिवस शांत राहा. तुम्ही काही बोलू नका, तुम्हीसुद्धा काहीच वक्तव्य करु नका. त्यानंतर मनातील राग शांत होईल. त्याप्रमाणे ते शांत राहिले. परंतु दुर्देवाने ते वेगळे झाले. आज अनेक वर्षांनी दोन्ही नेते एकत्र आले तर माझासारखा आनंद कोणाला होणार नाही. मी वेगळ्या पक्षात असलो तरी शिवसेनेसोबत माझे प्रेम कमी झालेले नाही. राजकारण एकीकडे आणि कुटुंब वेगळे असणे गरजेचे आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.




दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर शिवसेनेची शक्ती वाढणार का? त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. शिवसेनेची शक्ती वाढेल. दोन नेते वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांची राज्यात ओळख आहे. ते एकत्र आले तर शक्ती वाढणार नाही का? साधे कार्यकर्ते पक्षात आले तर शक्ती वाढते. मग दोन बडे नेते एकत्र आल्यावर शक्ती वाढणार नाही का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.