पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट
खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत संभाजीराजे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. संभाजीराजे यांनी स्वत: मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली.
मुंबई: मागच्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. पण तेव्हा केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांसाठी 900 कोटींचीही मदत आली की नाही याबाबत शंका आहे, अशा शब्दात भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. (chhatrapati sambhaji raje meet cm uddhav thackeray)
खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत संभाजीराजे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. संभाजीराजे यांनी स्वत: मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला हा घरचा आहेर दिला. पश्चिम महाराष्ट्रात मागच्यावेळी पूर आला होता. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे 2800 कोटींची मागणी केली होती. परंतु, त्यावेळी 900 कोटी रुपयेही मिळाले की नाही याची शंका आहे, अशी धक्कादायक माहितीही देत संभाजीराजे यांनी भाजपकडे बोट दाखवले. त्यामुळे कोल्हापूर-सांगलीच्या पुरावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, असंही ते म्हणाले.
दरम्यान, कालच औरंगाबाद येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात केंद्राकडे केलेली मागणी आणि मिळालेली मदत तसेच काँग्रेसच्या केंद्रातील सत्ताकाळात राज्याने मागितलेले पैसे आणि मिळालेली मदत याची आकडेवारी जाहीर केली होती. यूपीएच्या कालावधीत 26805 कोटी मागितले. पण केंद्राने, 3700 कोटी दिले. पण मोदी सरकारच्या काळात 25 हजार कोटी मागितले आणि 11 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. ही रक्कम युपीएपेक्षा तिप्पट होती, असा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आज लगेचच संभाजीराजे यांनी भाजपच्या काळातील मदतीचीच पोलखोल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, मराठवाड्यात शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही या भागाची पाहणी केली आहे. त्यांनाही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कॅबिनेटची बैठक बोलावून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना जगवण्यासाठी कर्ज घ्या
ओला दुष्काळ जाहीर केल्यास राज्याला केंद्राचे आणि राज्याचे म्हणून दोन्ही फायदे मिळू शकतात. त्यामुळे ‘एनडीआरएफ’मधून आपण कर्जही घेऊ शकतो. कोरोनाच्या काळात कर्ज घ्यावं की घेऊ नये, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण शेतकरी जगावयाचा असेल तर कर्ज घेतलंच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं.
आंध्रात शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात आली आहे. हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात जेवढी मदत करता येईल तेवढी करावी, असं त्यांना सांगितलं. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे जाणं गरजेचं आहे. हा प्रस्ताव गेल्यानंतर आठ दिवसात केंद्राची टीम येईल आणि राज्याला मदत मिळेल, असं ते म्हणाले.
रात्रीपर्यंत सर्व पंचनामे द्या
आतापर्यंत 80-90 टक्के पंचनामे झाले आहेत. आज रात्रीपर्यंत सर्व पंचनामे सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी दिली. (chhatrapati sambhaji raje meet cm uddhav thackeray)
संभाजीराजे LIVE – लाईव्ह टीव्ही https://t.co/geObg8OTjv pic.twitter.com/9zuDbfLx1V
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2020
संबंधित बातम्या:
ओला दुष्काळ जाहीर करा; लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणतात…
खडसेंना कोणतं मंत्रिपद?; भुजबळ म्हणतात, शरद पवारच निर्णय घेतील!
(chhatrapati sambhaji raje meet cm uddhav thackeray)