लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रस्ताव, पंकजा मुंडे म्हणाल्या त्याचा सन्मान पण…
छत्रपती यांनी आमच्यासारख्यांना इतके प्रेम दिले. माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे कमी आहे का? असे त्या म्हणाल्या. याचवेळी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला होता.
संभाजी मुंडे, परळी | 27 जानेवारी 2024 : माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या नक्षत्र महोत्सवाला उपस्थिती लावली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना सातारा लोकसभेतून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. हा कार्यक्रम संपवून पंकजा मुंडे या परळीत दाखल झाल्या. येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रस्तावावर मोठे भाष्य केले.
पंकजा मुंडे यांचे काल सातारा जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. नक्षत्र महोत्सवात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी उदयनराजे प्रचंड भावूक झाले होते. छत्रपती यांनी आमच्यासारख्यांना इतके प्रेम दिले. माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे कमी आहे का? असे त्या म्हणाल्या. याचवेळी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला होता.
पंकंजा मुंडे यांनी यावर बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असे जे सांगितले आहे त्याचा मी सन्मान करते. ते एक प्रेम आहे. त्याच्याकडे राजकीय अर्थाने बघत नाही. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या स्वागताने भारावून गेले. माहेरी गेल्याप्रमाणे माझे तिथे स्वागत झाले असे त्या म्हणाल्या.
मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय झाला. या निर्णयामुळे मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये आली आहे. त्यांचे ओबीसीत स्वागत आहे. मराठा समाजातील कुणबी म्हणून जी संख्या ओबीसीत समाविष्ट झाली त्यामुळे ओबीसीत थोडी गर्दी होणार आहेच. त्यामुळे नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे असे त्यांनी सांगितले.
मुंडे साहेबांपासून आपली एकच भूमिका आहे की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावे. मात्र, कुणबी म्हणून ओबीसीत समावेश झाल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा गुंतागुंतीचा होणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले याचा वेगळा विजय साजरा करून मराठा आणि ओबीसीमध्ये वितुष्ट येईल अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले. मराठा आणि ओबीसीमध्ये काहीसे वितुष्ट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. अशावेळी छत्रपती उदयनराजे आणि मी बहीण भावाच्या नात्याने एकत्र आहोत हे चित्र सकारात्मक आहे असेही त्या म्हणाल्या.