AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीसाठी जाणार

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीसाठी जाणार
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 3:44 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 30 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही बडे नेते एकत्र दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या विषयांवर खलबतं होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तयारीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच तयारीचा भाग म्हणून दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठीचे महाराष्ट्र सरकारमधील हे तीनही सर्वात प्रमुख नेते दिल्लीला जाणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात दिल्लीत आयोजित करण्यात येत असलेल्या एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएमधील घटक पक्षांचे प्रमुख नेतेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रात महायुतीचं जागावाटप कसं ठरणार?

देशभरातील बहुतेक विरोधी पक्ष हे एकत्र येताना दिसत आहेत. या विरोधकांच्या आघाडीचं इंडिया आघाडी आघाडी असं नाव त्यांनीच ठरवलं आहे. महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गट आणि काँग्रेस हे पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्षांसोबतही विरोधी पक्षांचं बोलणं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. देशात इंडिया आघाडीचा जन्म झाला असला तरी या आघाडीला महाराष्ट्रात महाविकास आघाडी अशी ख्याती आहे. या महाविकास आघाडीची राज्यात अडीच वर्ष सत्तादेखील होती. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि आघाडीची सत्ता गेली. आता परिस्थिती वेगळी आहे. पण तरीदेखील सत्ताधाऱ्यांसाठी त्यांचं कडवं आव्हान असणार आहे.

या संभाव्य आव्हानाचा विचार करता सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षदेखील कामाला लागले आहेत. एनडीएची येत्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. कारण सत्ताधारी पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी कसं जागावाटप होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात युतीमध्ये फक्त दोन मोठे पक्ष होते. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटही सहभागी झाल्याने महायुतीच्या जागावाटपाची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.