Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही श्रीरामाचं दर्शन घेणार, लवकरच अयोध्येत दौरा!
पुढील काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईः हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं सांगणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अयोध्या दौरा केला होता. अयोध्येतील नागरिकांनी आदित्य ठाकरेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत बसल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला. एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरेंवर यावरून अनेकदा टीका केली होती. हिंदुत्वविरोधी पक्षांशी मैत्री सोडून हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपशी नाते जोडण्याचे आवाहन एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार करण्यात आले. मात्र उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत अखेरपर्यंत फारकत घेतली नाही. शेवटी एकनाथ शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्यासाठी आम्ही वेगळा गट स्थापन करत असल्याचे जाहीर केले आणि महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आता हाच हिंदुत्वाचा मुद्दे अधिक ठळकपणे दर्शवण्यासाठी एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
हिंदुत्व ठळकपणे दर्शवण्यासाठी दौरा?
एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचे अद्याप जाहीर केलेले नसले तरीही उत्तर भारतीय मंचतर्फे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण आले आहे. त्यामुळे अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी पाठवलेल्या या निमंत्रणाचा स्वीकार एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनीही 15 जून रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मंदिराला भेट दिली होती. अयोध्या आणि शिवसेनेचे जूने नाते असल्याचे शिवसैनिकांकरून वारंवार सांगितले जाते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं राजकारण हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका होऊ लागली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी या दौऱ्याचं आयोजन केलं होतं. आता शिवसेनेतून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट याचसाठी अयोध्येत जाणार असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरेंना अयोध्येत विरोध का?
आदित्य ठाकरे यांच्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अयोध्येचा दौरा आयोजित केला होता. 5 जून रोजी राज ठाकरेंनी अयोध्येत जाण्याचे निश्चत केले होते. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आधी जाहीर माफी मागावी, त्यानंतरच अयोध्येत पाऊल ठेवावे, असे आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिले होते. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा स्थगित केला होता.