मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरून ८०० एकरापर्यंत वाढवण्यात आले आहे..
मुंबई: मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कांजूरमार्गच्या जागेसाठी एका नव्या पैशाचाही खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. तसेच आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले. आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरून ८०० एकरापर्यंत वाढवण्यात आले आहे.. आपण आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल. मात्र, यामुळे आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकार जनतेचा एकही पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत एका रात्रीत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडून टाकली होती. त्यामुळे आरे आंदोलन आणखीनच चिघळले होते. तेव्हा शिवसेनेने आपण सत्तेत आल्यास मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.
तेव्हापासूनच मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, कांजूरमार्गला कारशेड उभारण्याचा निर्णय व्यवहार्य नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या ताज्या निर्णयामुळे विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
CM Uddhav Thackeray | आपल्याला कोरोनासोबत जगायचंय, मास्क हीच आपली लस – उद्धव ठाकरे
खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये : उद्धव ठाकरे
(CM Uddhav Thackeray address Maharashtra)