Ganeshotsava 2020 | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन
कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray appeals to celebrate Ganeshotsava 2020 simply)
मुंबई : सामाजिक भान ठेवत समाजोपयोगी कार्यक्रम राबवून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले. आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. (CM Uddhav Thackeray appeals to celebrate Ganeshotsava 2020 simply)
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवातील कायदा, सुव्यवस्था संदर्भात व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks,गृहमंत्री @AnilDeshmukhNCP,राज्यमंत्री @satejp व @DesaiShambhuraj,राज्यातील गणेश मंडळाचे व मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 18, 2020
(CM Uddhav Thackeray appeals to celebrate Ganeshotsava 2020 simply)
शिर्डी, सिद्धिविनायक आणि यासारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
हेही वाचा : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय
“हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल” असं मुख्यमंत्री म्हणाले.
“ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करु, यासाठीचा कार्यक्रम निश्चित करुन आपण हा सण साजरा करु” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेश मंडळांच्या मार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा आपण विचार करु व हा उत्सव साजरा करु. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Uddhav Thackeray appeals to celebrate Ganeshotsava 2020 simply)