Vasant More: मुख्यमंत्र्यांची वसंत मोरेंना खुली ऑफर, मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही, राज ‘जप’ करणारे मोरे जाणार?
Vasant More: भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुणे: भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे (vasant more) यांना मनसेच्या (mns) पुणे (pune) शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मोरे यांना राष्ट्रवादीनेही पक्षात येण्याची ऑफर दिलेली असतानाच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भेटायला या असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना देण्यात आला आहे. खुद्द मोरे यांनी या बाबतची माहिती दिली आहे. मात्र, आपण अजूनही मनसेत आहोत. मनसे सोडण्याचा विचार केलेला नाही. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यांना कालच मेसेज केला आहे. मात्र, त्यांनी अद्याप मेसेजला उत्तर दिलं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नेते आदित्य शिरोडकर आणि युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनीही मोरेंना शिवसेनेत येण्यासाठी फोन केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबतची माहिती खुद्द वसंत मोरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरेंचा फोन आला होता. सीएमचा माझ्यासाठी फोन आहे म्हणून सांगत होते. त्यावेळी मी नेमका कात्रजमध्ये नव्हतो. मी सर्वांना सांगितलं मी अजून मनसेत आहे. माझा पदभार मी साईनाथ बाबर यांच्याकडे दिला आहे. पण मी मनसेतच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. मुख्यमंत्र्याचा आणि इतरांचेही फोन आले, असं मोरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंची वेळ मागितली
मी राज ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली आहे. मी रात्रीच राज यांना मेसेज केला आहे. पण मला काही रिप्लाय आला नाही. त्यांची काय नाराजी आहे मी कसे सांगणार? मी कट्टर कार्यकर्ता आहे. थोडाफार साहेबांचा राग असेल. मी कालच त्यांना भेटीची वेळ मागितली. माझ्याकडे सर्व पक्षाच्या ऑफर आहेत. पण मी मनसे सैनिक आहे. मला माझी भूमिका साहेबांना सांगावी लागेल. मी असं का बोललो ते सांगावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
माझ्यावर कारवाई झाल्याने राजीनामा
शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काल ते माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना मी राजीनामा देऊ नका म्हणून सांगितलं. पण त्यांनी राजीनामा दिला. माझ्यावर कारवाई झाली म्हणून त्यांनी राजीनामा दिला, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
आसारामच्या आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृतदेह, तीन दिवसांपासून होती बेपत्ता