Kolhapur By Election Result 2022 : अण्णांच्या मागे जनतेनं जबाबदारी पार पाडली, जयश्री जाधव यांची दणदणीत विजयानंतर पहिली प्रतिक्रिया
अण्णांच्या (चंद्रकांत जाधव) मागे जनतेने जबाबदारी पार पाडली, अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यानंतर गुलाल उधळत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.
कोल्हापूर : अण्णांच्या (चंद्रकांत जाधव) मागे जनतेने जबाबदारी पार पाडली, अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यानंतर गुलाल उधळत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. एकूण 92,012 मते त्यांना मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीत कदम यांना 73,174 मते मिळाली. या विजयानंतर महाविकास आघाडीतर्फे जल्लोष करण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur Election Result 2022) अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती.
‘माझी स्वाभिमानी जनता माझ्यासोबत असेल, असा विश्वास होता’
अण्णांचा आशीर्वाद हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे त्या म्हणाल्या. अण्णा तळागाळात पोहोचले. त्यामुळे जनतेने प्रेम दिले. माझी स्वाभिमानी जनता माझ्यासोबत असेल, असा विश्वास होता. त्यामुळे जनतेचे आभार मानत असल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. ही पाच वर्षे अण्णांची हक्काची पाच वर्षे होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
‘भाजपाने लादली पोटनिवडणूक’
ही पोटनिवडणूक व्हायला नको होती. भाजपाने मोठेपणा दाखवायला हवा होता. चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपेक्षा होती. त्यांच्यासाठी हे चांगले ठरले असते. अण्णांनी काँग्रेसचे काम प्रामाणिकपणे केले होते. त्यामुळे इतर पक्षांचा विचार कधीच केला नाही. आपल्या विजयामागे महाविकास आघाडीचे सर्व नेते असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. विशेषत: आपल्या स्वाभिमानी जनतेचे त्यांनी आभार मानले.