भाजपकडून विरोधकांची सतत बदनामी; काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला
भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे अशाच एका प्रकरणात गुजरातमध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
गडचिरोली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी अशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत भाजपवर हुकूमशाहीचा ठपका ठेवत विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अशा पद्धतीने राजकारण केले जात आहे अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.
त्यामुळे आता राहुल गांधी यांना शिक्षा सुनावताच गडचिरोलीमध्ये काँग्रेसने आंदोलन करत भाजपच निषेध व्यक्त केला आहे.
काँग्रेसकडून भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, केंद्रातील हुकूमशाह बनलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वखाली भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे.
तसेच सरकार विरोधी बोलणाऱ्यांना,शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज बनू पाहणाऱ्या नागरिकांचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत अस्लयाचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेसने लोकशाहीचा मुद्दा पुढे करून भाजपकडून लोकशाही विरुद्धी भूमिका कशी घेतली जात आहे. तसेच लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेतही विरोधकांना बोलू दिले जात नाही असाही गंभीर आरोप भाजपवर करण्यात आला आहे.
खोटे आरोप लावून विरोधकांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असून ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हुकुमशाहीवृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यामुळेच मोदी सरकार व भाजपाने काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका केली आहे.
भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे अशाच एका प्रकरणात गुजरातमध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
याचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात आले आहे.