काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 45 जागा निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र महायुतीचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे. तब्बल 230 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यात 131 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसला राज्यात केवळ 15 च जागा मिळाल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले पटोले?
हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि आमच्यासाठी अनपेक्षित आहे. याची चौकशी केली जाईल याचे मी समर्थन करतो. आता सत्तेत लोक आहेत ते म्हणतात की लाडक्या बहिणींनी आम्हाला तारलं, त्यामुळे त्यांनी आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावेत. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी जी अश्वासनं दिली आहेत, त्याची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांनी काम करावं. मोदीजी म्हणाले होते, आमचे सरकार धुतल्या तांदळासारखे आहे. हे सरकार स्वच्छ असावं ही आमची भूमिका आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्हाला ईव्हीएम वर चर्चा करायची नाही, मात्र आम्ही याचा अभ्यास करू. पत्रकारांना ईव्हीएमवर शंका असेल आम्हाला नाही. फडणवीस, शिंदे यांच्या सभेला गर्दी जमत नव्हती, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हीच चर्चा सुरू आहे, हे नेमकं कसं घडलं? वाद आमच्यापेक्षा जास्त महायुतीमध्ये होता, पण सोशल मीडियावर आमची जास्त चर्चा झाली, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.