‘वाघ्या श्वान मी त्याला… ‘, वादात सदावर्तेंची उडी, संभाजीराजे छत्रपतींबद्दल केली मोठी मागणी
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची ठिणगी पडली आहे, या वादात आता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी यावर बोलताना मोठी मागणी केली आहे.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची ठिणगी पडली आहे, संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते, असा दावा केला आहे. तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर प्रतिक्रिया देताना भिडे गुरूजी यांनी म्हटलं की संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून वाद सुरू असतानाच आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
संभाजी भिडे गुरुजी यांचं या विषयावर चिंतन आहे, त्यांचं मी समर्थन करतो. वाघ्या श्वान आहे, मी त्याला कुत्रा म्हणणार नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाचा निर्णय विचारात न घेता समाधी निष्कासित करण्याची मागणी केली. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याकाळी फुलेंनी समाधी शोधली, टिळकांनी, होळकरांनी जे काम केलं ते इतर घराण्यांनी काम का नाही केले? असं म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या भोसले घराण्यावर देखील निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटलं की, राज्यपालांना विनंती करेल की संभाजीराजे छत्रपती यांना पदावरून बाजुला करावं, त्यांनी कोणता रिसर्च पेपर काढला आहे, यावर? या मुद्द्यावर आम्ही माहिती गोळा करत असून, पंतप्रधान मोदींसमोर हा विचार ठेऊ. प्राधिकरणाने आतापर्यंत काय कार्य केले? त्यासंदर्भात चौकशीची मागणी न्यायालयात करू,असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘यासंदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल या स्मारकाकरीता होळकरांनी देखील पैसे दिले होते. त्यामुळे थेट पुतळा काढण्यावरून समाजात वाद निर्माण होऊ शकतो. इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा तिथे आहे. त्यामुळे त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं फडणीस यांनी म्हटलं आहे.