Covid 19: मुबंई, पुणे, नांदेड, बंगळुरुवरून आलेल्या प्रवाशांनी चिंता वाढवली; नागपूर, वाशिममध्ये कोरोना रुग्ण वाढले
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा वाढत आहे. नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत एकूण 50 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे वाशिम, सातारा आणि नवी मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत.
नागपूर : कोरोनाची (Corona) लाट ओसरली आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत नागपूर (Nagpur) जिल्ह्यात तब्बल 50 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात एकूण 2 हजार 33 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधून पन्नास जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 253 वर पोहोचली आहे. तर कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 2.5 टक्के एवढा आहे. मुंबई, पुणे नांदेड आणि बंगळुरुवरून नागपुरात दाखल होणाऱ्या प्रवाशांनी नागपूरकरांची चिंता वाढवली आहे. मुंबई, पुण्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पुणे आणि मुंबईमधून (Mumbai) नागपुरात प्रवासी येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली
दरम्यान दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात देखील हळूहळू कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 5 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोना रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा हा 20 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 45 हजार 801 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 45 हजार 141 जणांनी कोरोनावर मात केली. तर 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 20 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
राज्यात 4024 रुग्णांची नोंद
देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी एकूण 4024 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा मोठा असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट असलेल्या बी. ए. 5 व्हेरिएंटच्या विषाणूनची लागण झालेले चार रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. समाधानकारक बाब म्हणजे जरी कोरोना रुग्ण वाढत असले तरी देखील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे.
नवी मुंबईत आठवडा भरात 300 रुग्णांची नोंद
नवी मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईत गेल्या आठवडाभरात तीनशे नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून रुग्ण वाढू लागले आहेत. जिल्ह्यात मागील मागील 24 तासात 415 कोरोना चाचण्या करण्यात आल्या यापैकी जिल्ह्यातील 6 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.