जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीस यांची सीआयडी चौकशीची घोषणा
माझ्या मुलीला, जावयाला ठार मारण्याची धमकी दिली. त्याचा ऑडिओ समोर आला. मला मुख्यमंत्र्यांकडून फोन येईल अशी अपेक्षा होती. पण, अपेक्षाभंग झाला.
मुंबई : मी आणि मख्यमंत्री एका कार्यक्रमात असताना एक महिला समोर आली. तिला हाताने बाजूला करत ताई गर्दी आहे पुढे जाऊ नका, धक्काबुकी होईल, अशी सूचना केली. त्यानंतर रातोरात बैठक होते आणि माझ्याविरोधात ३५४ चा गुन्हा दाखल केला जातो. मला मारण्याची सुपारी दिली जाते. माझ्या मुलीला, जावयाला ठार मारण्याची धमकी दिली. त्याचा ऑडिओ समोर आला. मला मुख्यमंत्र्यांकडून फोन येईल अशी अपेक्षा होती. पण, अपेक्षाभंग झाला. माझ्या कुणाकडून अपेक्षा नाहीत पण फडणवीसांकडून अपेक्षा आहेत, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
गृह खात्याच्या अर्थसंकल्पिय अनुदानाच्या मागण्यावरील चर्चेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ठाण्यात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस उठसूठ कुणाविरुद्धही कारवाई करतात. मला नोटीस न देता अटक केली. कंत्राट कुणी घ्यायची यावरून ठाण्यात पाच ते सात खून झाले. सुसंस्कृत ठाणे शहर क्राईम कॅपिटल होऊ लागले आहे असे म्हणत त्यांनी ठाण्याचे सहआयुक्त महेश आहेर यांचे कथित कारनामे सभागृहात मांडले.
एका आमदाराच्या मुलीला आणि जावयाला खुलेआम मारण्याची धमकी दिली जात असेल. धमकी देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, असा सवाल त्यांनी केला.
जे जे हत्याकांडातील मुख्य आरोपी सुभाषसिंग ठाकूर याच्याशी आपले सबंध आहेत असे तो सांगतो. स्पेनला फिल्डिंग लावून गेम वाजवायची धमकी हा सह आयुक्त देतो. त्यावर सरकारकडून काहीही कारवाई होत नाही. साधी तक्रार नोंदवली जात नाही. तो ऑडिओ फॉरेन्सिकला पाठवला आहे एवढेच सांगितले जात आहे. ही एका आमदाराची अवस्था आहे, असे आव्हाड म्हणाले.
मागील पाच वर्ष आम्ही त्याच्या शिक्षणाची माहिती मागतो आहोत. तो १० वी पास आहे. पण त्याची इतकी चालते की त्याचे शिक्षणाचे प्रमाणपत्र कुणी दाखवत नाही. आयुक्तही प्रमाणपत्र देत नाहीत. एक शिक्षण नसलेला अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांचा बाप म्हणून वागतो आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील होते. पण, त्यांचा साधा एक फोन आला नाही. पण, मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे असे ते म्हणाले.
त्याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सह आयुक्त महेश आहेर यांची सीआयडी मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली. राज्यात अशा प्रकारे कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही. तसेच आहेर यांची शैक्षणिक पात्रताही तपासण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.