वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार; दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप
या प्रोजेक्ट साठी उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप केसरकर यांनी केला.
मुंबई : महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture)गुजरातला गेल्यामुळे राजकारण पेटले आहे. विरोधक शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला करत आहेत. तर, हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar ) यांनी केला आहे.
वेदांता प्रोजेक्ट गुजरातला गेला याला तत्कालीन मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा थेट आरोप केसकर यांनी केला आहे. हा आरोप करताना केसरकर यांनी अनेक खुलासे देखील केले आहते.
मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप केसरकर यांनी केला.
कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती महाराष्ट्र असते मात्र गेल्या सरकारच्या अस्थिर राजकारणानं, हा उद्योग गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे केसरकर म्हणाले.
महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी मागील सरकार किती सिरीयस होतं ? असा म्हणत दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
हाय लेव्हल परदेशी डेलिगेशनला भेटायला यांना वेळ नव्हता. आज त्यांचा मुलगा आदित्य वाट्टेल तसे आरोप करतोय हे वैषम्य आहे. शरद पवार यांच्या वर बोलणार नाही. मी त्यांचा आदर करतो. पण आमचं सरकार गुंतवणूक आणणार. उदय सामंत यांच्यावर काय टीका करता ? खोके … वगैरे पोरकटपणासारखे आरोप करतात.
मोठा प्रकल्प यावा यासाठी राज्या राज्यात स्पर्धा असते. महाराष्ट्रापेक्षा गुजरातनं अधिक चांगलं पॅकेज दिलं असावं. सुभाष देसाई हे गेल्या सरकार मध्ये उद्योग मंत्री होते त्यांनी काय केले.
वेदांताच्या अग्रवालांना स्पष्टीकरण द्यावं लागतं ही त्यांना खंत असावी. म्हणून त्यांनी महाराष्ट्रात, संलग्न उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. अग्रवाल यासोबत पुन्हा संवाद सुरू झाला की नाही याबाबत उद्योग मंत्री लवकरच भूमिका स्पष्ट करतील असेही केसरकर यांनी सांगीतले.