दिल्ली हायकोर्टाकडूव ठाकरे पिता-पुत्रांसह राऊतांना समन्स, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?
खोक्यांच्या टीकेवरुन खासदार राहुल शेवाळेंच्या याचिकेवरुन दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांनाही समन्स बजावलं आहे.
नवी दिल्ली : ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘2 हजार कोटीत सौदा झाला’, याच टीकेवरुन, मानहानीच्या प्रकरणात थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊतांनाही दिल्लीच्या हायकोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. मानहानीच्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर सुनावणी झाली आणि ठाकरे पिता पुत्रांसह राऊतांनाही समन्स बजावण्यात आलं.
मानहानीचं प्रकरण नेमकं काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. तसंच 50 खोके अर्थात 50 कोटींवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे टीका करतायत. यावरुन प्रत्यक्ष कोर्टात हजर राहून उत्तर द्या असं दिल्ली हायकोर्टानं म्हटलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, ठाकरे गटाकडून 50 खोक्यांची टीका सुरु झाली. आता कोणतीही सभा असो, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 50 खोक्यांवरुनच शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करतात.
निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांसाठी 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी ऑन कॅमेरा केला होता. त्याचाही संदर्भ राहुल शेवाळेंनी याचिकेत जोडलाय. आता ठाकरे पिता पुत्र आणि राऊतांना कोर्टात हजर राहून म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळं 17 एप्रिलला हे तिघेही दिल्लीच्या हायकोर्टात हजर राहणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.