‘धिस इज नॉट फेअर’.. नेते भाजपात आल्यावर कारवाया थांबतात कशा? सुप्रिया सुळेंचा Narendra Modi यांना सवाल
तुम्हाला जर ईडीची रेड करायची आहे तर सगळ्याच पक्षांमध्ये करा. बीजेपीवाल्यांवर जेव्हा आरोप होतात, त्यानंतर ते बीजेपीत येतात. मग त्यांची कारवाई कशी थांबते. this is not fare... या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असावं, अशीच माझी अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supiya Sule) यांनी केलं आहे. दिल्लीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पंतप्रधानांना या सर्व प्रकाराबद्दल मी अत्यंत विनम्रपणे याविषयीचा प्रश्न विचारणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं. भाजपाच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपात आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असं का होतं? त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाणे येथील मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. तसेच पाटणकर आणि ठाकरे कुटुंबातील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरु आहे. भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्र सरकारने तपासयंत्रणांना हाताशी धरून सूडसत्र चालवले आहे, असा आरोप महाविकास आघाडीतर्फे केला जात आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
दिल्लीत पत्राकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आमचे नेते नवाब मलिक म्हणत होते, त्याप्रमाणेच हा सगळा फर्जीवाडा आहे. कुणावर टीका करेपर्यंत अनेक नेते इथे क्लीन असतात. पण कुणी विरोधात बोललं की त्यावर कारवाया होतात, अशी सगळी गंमत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनम्रपणे विचारणार आहे. देश सुधारणार असतील तर त्यांचं मनापासून स्वागत करते. मी स्वतः त्यांचा जयघोष करते. पण चेरीपिकिंग करायचं असेल… सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर ये नही हो सकता. तुम्हाला जर ईडीची रेड करायची आहे तर सगळ्याच पक्षांमध्ये करा. बीजेपीवाल्यांवर जेव्हा आरोप होतात, त्यानंतर ते बीजेपीत येतात. मग त्यांची कारवाई कशी थांबते. this is not fare… या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असावं, अशीच माझी अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी उभं राहणार…
ठाकरे कुटुंबाला याप्रकरणी पूर्ण मदत करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 55 वर्षांचे ऋणानुबंध आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांचेही मैत्री आणि आदराचे संबंध आहेत. पुढील 100 वर्षेही राहतील. कोणाच्याही घरात अन्याय होतो, तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यापुढेही असतील..
जितेंद्र आव्हाडांच्या आत्महत्येच्या वक्तव्याबाबत…
माझ्या मुलीचं नाव ईडीच्या कारवाईत आलं तर मी आत्महत्या करीन, असं खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत कधीही कुटुंबावर आरोप करण्याची संस्कृती नव्हती. कै. यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आमच्यावर. आदरणीय पवार साहेब 55 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. पण आम्ही कधीही असे आरोप केलेले नाहीत. पण आज जे आरोप होतायत, ते आपलं दुर्दैव आहे. ते कसेही वागले तरीही आम्ही तसे वागणार नाहीत. जितेंद्र आव्हाड हे भावनिक आहेत. त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर बातम्या-