आंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
महानगर पालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेवून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विशेष प्रयत्नाने आज दूरदृष्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली.
मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिलेत. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन हे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महानगर पालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेवून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विशेष प्रयत्नाने आज दूरदृष्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. (Demolition of houses in Ambil Odha area of Pune postponed, Instructions of Eknath Shinde)
आंबिल ओढ्यातील रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करु नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन बाधितांना कायमची घरे देण्यात यावी, अशा सूचना डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. त्यावर राज्य शासन सर्वांना घरे देण्याबाबत सकारात्मक आहे. लोकांना न्याय द्यायचा आहे, कुणालाही बेघर करणार नाही हीच शासनाची भूमिका आहे. सद्यस्थिती ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. येत्या काळात त्यांना हक्काची घरे देण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती नगरविकास शिंदे यांनी दिली.
‘पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक’
या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या तोडकामाला न्यायालयाने ही 7 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. हा प्रश्न शासन स्तरावर प्रश्न सोडवावा असे आदेश दिल्याची माहिती डॉ. निलम गोऱ्हे यांनी देऊन न्यायालय व शासनाचे ही आभार मानले.
एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्याप्रमाणे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. यात आंबील ओढा येथील नागरिकांचे पुनर्वसन संदर्भात पुढील माहिती जनतेसमोर वेळोवेळी पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून तपशील निश्चित करण्यात आला. याबाबत नागरिकांशी बोलून पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
‘कोणालाही बेघर करणार नाही’
आज आंबिल ओढयातील घर तोडकाम झालेल्या रहिवाशांची स्थलांतर राजेंद्र नगरमध्ये केले जात आहे. अतिक्रमण हाटवण्याच्या कारवाईबाबत या पूर्वी रहिवाशांना आवाहन तथा सूचना देण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या स्वरुपात सर्वांचे स्थलांतरीत करण्याची कारवाई सुरु आहे. कोणालाही बेघर करणार नाही, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी मशाल सर्व्हे व झोपु प्राधिकरणाच्या आदी नुसार पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पा विषयी पाच जणांची समिती ही नेमन्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.
संबंधित बातम्या :
आंबिल ओढ्यातील तोडक कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती, स्थानिकांना मोठा दिलासा
Demolition of houses in Ambil Odha area of Pune postponed, Instructions of Eknath Shinde