दिल्लीत अजितदादा अमित शाहांना भेटले? बैठकीत नेमकी कशावर चर्चा?
मोठी बातमी समोर येत आहे, आज अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, मात्र बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये.
मोठी बातमी समोर येत आहे, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे वातावरण तापलं आहे, त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र या भेटीत नेमकी कशावर चर्चा हे अद्याप समोर आलेलं नाहीये.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अजून केंद्रात एकही मंत्रिपद मिळालं नाहीये. पक्षाला मंत्रिपद मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. फेब्रुवारी महिन्यात केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिपद मिळावं यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटल्याची देखील चर्चा आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे देखील अजित पवार हे अमित शाह यांना भेटले असावेत अशी चर्चा आहे. या भेटीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुबाबत देखील चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.
मात्र या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.