‘मातोश्री’चे दार उघडे, पंकजा मुंडे खरंच भाजपला सोडचिठ्ठी देणार? भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) खुली ऑफिर मिळालीय. या ऑफरवर पंकजा काय प्रतिक्रिया देतात ते पाहण महत्त्वाचं ठरेल.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) खुली ऑफिर मिळालीय. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातलीय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दार उघडे असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला तर आगामी काळात मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मराठवाड्यात प्रचंड मोठा फायदा होऊ शकतो. पंकजा यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाची ताकद निश्चितच वाढेल. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांचा भलामोठ्या समुहाची ताकद ठाकरे गटाच्या पाठीमागे उभी राहू शकते. त्यामुळे भाजपला याचा निश्चितच फटका बसू शकतो. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर आता महाराष्ट्रातील भाजपचे पहिल्या फळीतील एक नंबरचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
पंकजा मुंडे भाजपसोडून कुठेही जाणार नाहीत, याची खात्री असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ठाकरे गटाने खुली ऑफरच दिलीय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल हा विश्वास व्यक्त केला.
“पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचं दार जरी उघड असलं तरी त्या दाराने पंकजा कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष हेच त्यांचं घर आहे. त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत. अशाप्रकारचे विधानं त्यांनी कितीही केले तरी ते राजकीय असतील. त्या विधानांना फार काही महत्त्व नसेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंकजा मुंडे यांना नेमकी कुणी ऑफर दिली?
ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी केलं आहे.
“पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू”, असं सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे.
“देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तपास यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांनाच फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्व पापं धुतली जात आहे. यावरून काय ते कळून येतं”, असंही शिंदे म्हणाले आहेत.