Devendra Fadnavis: ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीवर फडणवीसांचं कडक उत्तर
मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली नाहीत. युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमने बॉम्ब आहे, असा घणाघात केला. तसेच नवाब मलिक यांचं समर्थन केल्यावरूनही फडणवीसांनी जोरदार टीका केली.
मुंबई : गुरूवारी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या आरोपांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी समाचार घेतला. मात्र मुख्यमंत्री बोलून काही थोडा वेळच झाला होता. मात्र काही तासातच मुख्यमंत्र्यांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली नाहीत. युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमने बॉम्ब आहे, असा घणाघात केला. तसेच नवाब मलिक यांचं समर्थन केल्यावरूनही फडणवीसांनी जोरदार टीका केली. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने केलेल्या युतीबाबतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर तुम्ही ईडीला (ED Raid) घरगडी म्हणताय. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आज विधानसभेत ईडीवरून आणि ईडीच्या धाडीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनसामने आल्याचे दिसून आले.
ही अक्कल राऊतांना देणार का?
उद्या आम्ही मुंबई पोलिसांना घरगडी म्हणायचं का? असा सवाल करत फडणवीसांनी प्रवीण दरेकरांवरील कारवाईचा उल्लेखही केलाय. तुम्ही सुडाच्या भावनेतून दरेकरांवर कारवाई केली. मी तर म्हणतोय की उद्या कुणाचा नंबर, परबा कुणाचा नंबर हे कुणीच घोषित करु नये मात्र ही अक्कल तुम्ही संजय राऊतांना देणार आहात का? त्यांनी घोषित केलं ना की, बाप बेटा जेलमध्ये जाणार, आमका जाणार तमका जाणार, म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही दिवसात संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे जेलमध्ये जाणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. त्यावरून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना हे प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. पण कोणत्या थराला जायचं. मलिकांचा राजीनामा तथ्य असेल तर करू घेऊ, पण आरोपात तथ्य तर पाहिजे. एखादा नेता चार पाचवेळा निवडून येतो. मंत्री बनतो, तरी केंद्राच्या यंत्रणांना माहीत नाही पोकळ यंत्रणा झाल्या का? टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतात का एजन्सी? या एजन्सी म्हणजे बाण आहे. हातात घ्यायचं आणि लक्ष्यावर मारायचं, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. ईडीला तुम्हीच माहिती दिली. असं वाचलं मी ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही. असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाही कोपरखिळ्या मारल्या.