भाषेबद्दल नवनिर्वाचित आमदाराचा संवेदनशीलपणा, विधानसभेत बोलीभाषेचा जागर, भाजप आमदाराकडून अहिराणीत शपथ
धुळे शहराचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानसभेत अहिराणी भाषेत शपथ घेतली आहे. यामुळे खान्देशातील अहिराणी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहिराणी भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि राज्यातील लाखो अहिराणी भाषिकांकडून अनुप अग्रवाल यांचे कौतुक केले जात आहे.
आपली भाषा हे आपलं अस्तित्व आहे. भाषा हे आपल्या अस्तित्वाचं आणि संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. बोलीभाषांमध्ये असलेल्या गोडव्यामुळेच मराठी भाषा जास्त समृद्ध झालेली आहे. मराठी भाषेला आता तर अभिजात दर्जा मिळाला आहे. असं असलं तरीही खान्देशात अहिराणी भाषेचा सर्वाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी साहित्यिक आणि कलाकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे ही चळवळ आता नेतेमंडळींनीदेखील मनावर घेतली आहे. अहिराणी भाषेत शेकडो वर्षांपासूनचं मौखिक साहित्य आहे. जात्यावरची गाणी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या, लग्नाची विविध गाणी, यूट्यूबरचे हिट अहिराणी गाणी यामुळे देशात आणि जगात अहिराणी भाषा पोहोचली आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेतही आज अहिराणी बोल ऐकायला मिळाले. खान्देशातील धुळ्याच्या भाजप आमदारांनी अहिराणीत आपल्या आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. राज्यातील 2 कोटी अहिराणी भाषिक तथा खान्देशी नागरिकांकडून या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. विशेष अधिवेशनात काल आणि आज नव्या आमदारांनी आपल्या आमदारकीचं आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या दरम्यान आज धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील आपल्या आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांनी अहिराणी भाषेत शपथ घेतली.
नेमकं काय घडलं?
शपथविधीच्या वेळेस विधान भवनात आज ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा घुमला. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणीतून शपथ घेतली. अनुप अग्रवाल हे भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांनी एमआयएमचे आमदार फारुख शाह आणि ठाकरे गटाचे अनिल गोटे यांचा पराभव केला आहे. अहिराणीतून शपथ घेत त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जय अहिराणी, जय खान्देश आणि जय श्रीराम असा जयघोष देखील अनुप अग्रवाल यांनी केला.