Dhule : धुळ्यातून महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न; तलवारीवरून राजकीय खडाजंगी, आरोप-प्रत्यारोपाला उधाण
धुळ्याचे शिवसेना महानगरप्रमुख मनोज मोरे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. त्यामुळेच विरोधकांना हे सहन होत नसून, सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा कट आहे.
धुळेः धुळ्यातून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू होता का, असा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना विचारत आहेत. त्याला कारण ठरण्यात धुळ्यात (Dhule) सापडलेल्या 90 तलवारींचा साठा. मुंबई – आग्रा (Mumbai – Agra) महामार्गावर शिरपूरकडून जालन्याकडे (Jalna) जाणाऱ्या चारचाकी वाहनाला सोनगीर पोलिसांनी थांबवले. त्यांची झडती घेतली. तेव्हा हा तलवारीचा साठा सापडला. या प्रकरणी चालकासह तिघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्या तलवारी नेमक्या कोणाकडे जात होत्या, याच्या मागे कोण, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखता तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणी चारही आरोपीना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी टीव्ही 9 शी बोलताना माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले आहेत.
सरकार अस्थिर करण्याचा कट
धुळ्याचे शिवसेना महानगरप्रमुख मनोज मोरे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. त्यामुळेच विरोधकांना हे सहन होत नसून, सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. तलवारी प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून यामागील खऱ्या सूत्रधारांना समोर आणून अटक करण्याची मागणीदेखील मोरे यांनी केली आहे.
वातावरण दूषित करण्याचे काम
मोरे म्हणाले की, काही दिवसांपासून राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम विरोधक करत असून, त्यांचा हा इरादा सेना कधीही सफल होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. महाबली हनुमानाचे आम्ही देखील भक्त आहोत. मात्र, हनुमान चालिसाच्या नावाने रस्त्यवर बाजार मांडणे बंद करा. हनुमान चालिसा आम्ही देखील म्हणतो. मात्र, रस्त्यावर उतरून हनुमान चालीसाच्या नावाने राजकारण विरोधक करत असल्याचे मोरे म्हणाले.
तलवारी नेमक्या कुठे जात होत्या?
भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी म्हणाले की, सोनगीर पोलिसांनी पकडलेला तलवारी नेमक्या पुढे जात होत्या त्याची सखोल चौकशी करून पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. तसेच राज्यातील वातावरण पाहता पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी महोदयांनी माझ्या घरासह सर्वांच्याच घराची चाचपणी करावी. जेणेकरून सत्य समोर येईल. धुळे पोलिसांसह महाराष्ट्रातील पोलिसांनी दक्ष राहून या गोष्टीचे गांभीर्य ओळखावे, असे देखील हिरामण गवळी यांनी म्हटले आहे. हे फक्त हिमनगाचे टोक सापडले असून यातील काही तलवारी लंपास देखील झाल्याचा आरोप हिरामण गवळी यांनी केला आहे.